पारोळा : तालुक्यातील शेवगे प्र.ब. येथील ग्रामसेवकास २५ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदार हे ग्रामपंचायत येथील सरपंच असून सन २०१८ मध्ये गावातील ३८ लाभार्थ्यांना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या बांधकामाचे कामात लाभार्थी यांना प्रत्येकी १२ हजार रुपये मिळाले आहेत. तसेच सन २०१९ मध्ये गावातील गाव विहिरीचा गाळ काढण्याचे काम घेतले असता सदर कामाचे ५२ हजार रुपये तक्रारदारांना मिळाले होते. यावेळी ग्रामसेवक श्याम पाटील यांनी दि. २५ रोजी पंचायत समिती पारोळा येथे तक्रारदार यांना बोलावुन शौचालयाचे काम व गाव विहिरीच्या गाळाचे कामाचे बिल काढुन दिले आहे. त्याच्या मोबदल्यात तू मला ३० हजार रुपये न दिल्यास मी पुढचे कुठलेही बिल मंजूर होऊ देणार नाही, असे सांगितले. त्यावरुन ही बाब तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग धुळे यांच्याकडे तक्रार दिल्याने सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२६ रोजी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडे ग्रामसेवक श्याम पाटील यांनी २५ हजाराची मागणी केली. त्यानुसार दि. २७ रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष ग्रामसेवक श्याम पाटील यांना २५ हजारांची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांचे मार्गदर्शात पोलीस उपअधिक्षक सुनील कुराडे,महेश भोरटेकर,जयंत साळवे,संतोष हिरे,संदीप सरग,सुधीर सोनवणे,कृष्णकांत वाडीले,शरद काटके,कैलास जोहरे,प्रकाश सोनार,प्रशांत चौधरी,भूषण खलाणेकर,संदीप कदम,सुधीर मोरे यांनी कारवाई केली.