जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे, खोटे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीअंती दोन लोकनियुक्त सरपंचासह दोन सदस्य अपात्र करण्यात आल्याची माहिती विधी अधिकारी अॅड. हरूल देवरे यांनी दिली. .
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दगडू सांगडकर यानी २०१५ च्या निवडणुकीत खोटे व बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत चंद्रकांत धायडे यांनी तक्रार केली होती. तसेच जात वैधता समितीने हे प्रमाणपत्र रद्द करून राजेंद्र सांगडकर यांच्याविरूध्द फौजदारी कारवाईची शिफारस केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सांगडकर यांना अपात्र करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात अमळनेर तालुक्यातील तासखेडा येथील लोकनियुक्त सरपंच लताबाई नाना ठाकुर यांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार सुनंदा भील यांनी केली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी लताबाई ठाकुर यांचे सरपंच पद रद्द केले. तसेच प्रतिस्पर्धी म्हणून सरपंच पदी मला संधी द्यावी असा अर्ज विठाबाई ठाकुर यांनी केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळून लावला.