चाळीसगाव येथे वीज वितरण कंपनीच्या समस्या निवारणार्थ तालुकास्तरीय ग्राहक मेळावा संपन्न
ग्राहकांच्या समस्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समाधान
चाळीसगाव – आज शेतकरी विशेषतः ग्रामीण भागातील वीज ग्राहक अडचणीत आहे. जमिनीत मुबलक पाणी आहे परंतु वीज कनेक्शन शासनाने बंद केल्याने शेतीला पाणी असून देता येत नाही. ज्यांच्या कडे वीज आहे त्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जर सर्वसामान्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत सरकारने शेतकऱ्यांना वीज कनेक्शन उपलब्ध ण केल्यास वेळप्रसंगी तिघाडी सरकारच्या शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या धोरणाच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.
ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत व म.रा.वि.वि.कंपनी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांच्या समस्या निवारणार्थ आयोजित ग्राहक मेळाव्यात बोलत होते. शहरातील राजपूत मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्याला योगाचार्य वसंतराव चंदात्रे, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम, पं स गटनेते संजय भास्करराव पाटील, जि प सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, माजी पं स सभापती दिनेशभाऊ बोरसे, सदस्य सुभाषदादा पाटील, पं स सदस्य पियुष साळुंखे, ग्राहक पंचायत अध्यक्ष रमेश सोनवणे, ग्राहक पंचायतीचे सचिव रावसाहेब पाटील, नगरसेविका संगीता गवळी, जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, नगरसेवक भास्कर पाटील, मानाभाऊ राजपूत, नगरसेवक नितीन पाटील, पं स सदस्या भडगाव डॉ अर्चनाताई पाटील, माजी पं स सदस्य बाळासाहेब राऊत, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, बेलगंगा माजी व्हा चेअरमन रविंद्र केदारसिंग पाटील, धनंजय मांडोळे, विवेक चौधरी, अनिल नागरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता जि टी महाजन, एच ए जगताप, ए बी गढरी, व्ही व्ही बाविस्कर, जि एस जनोकर, जे बी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, ज्या दिवशी आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींची पेटी रिकामी असेल, ज्यादिवशी दुसरा ग्राहक मेळावा घेण्याची वेळ येणार नाही, त्यादिवशी खऱ्या अर्थाने ग्राहक मेळावा यशस्वी झाला अस म्हणता येईल. शेवटच्या व्यक्तीची समस्या सुटेपर्यंत मी स्वतः वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व स्तरातील ग्राहकांच्या समस्या आज सोडविण्यात येतील. इतर तालुक्यात अनेक तालुक्यात ३० ते ४० शेती ट्रान्सफार्मर बंद पडलेले असताना आपल्या चाळीसगाव तालुक्यातील चांगल्या अधिकाऱ्यांमुळे आज या समस्येतून मुक्तता झाली आहे. ज्याप्रमाणे एखाददुसरा अधिकारी – कर्मचारी च्या कामचुकार पणामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो तेव्हा आपण त्याच्या बदलीची,कारवाईची मागणी करतो मात्र त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक सुद्धा व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.
मेळाव्याच्या सुरुवातीला आजच दुखद निधन झालेले सहकारातील जाणते नेते कै.उदेसिंगअण्णा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना सांगितले की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब यांनी मनोगतात सांगितले की, वीज ग्राहकांनी आपल्या ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेत्ल्यास त्यांच्या अनेक अडचणी घरबसल्या सुटतील, हा मेळावा ग्राहक आणि वीज कंपनी यातील अंतर कमी करण्यासाठी महत्वाचा असून आमदार मंगेश चव्हाण यांनी आमच्या चांगल्या कामांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कौतुक केले त्याबद्दल त्यांनी आभार मानले तसेच तालुक्यातील ७० हजार वैयक्तिक व २७ हजार शेती पंप ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची हमी त्यांनी दिली.
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष के बी साळुंखे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतीसाठी विजेचा प्रश्न नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मांडून त्यांची व्यथा सरकार समोर आणल्याचे सांगितले तर ग्राहक पंचायतीचे सचिव रावसाहेब पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, योगाचार्य वसंतराव चंदात्रे यांनी मनोगतातून ग्राहकांच्या समस्या मांडल्या.
आमदारांच्या जनता दरबारात ग्राहकांचे समाधान
मेळाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बसून ग्राहकांच्या समस्या जाणून घेत होते तसेच तातडीने सोडविण्याच्या सूचना ते करत होते. आमदारच बैठक मारून समस्या जाणून घेत असल्याने उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचा उत्साह वाढला. तसेच आमदारांभोवती समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जनता दरबाराचे स्वरूप त्याला आले होते.
ग्राहकांची समस्या सोडविणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व तालुक्यातील वीज कंपनीच्या १६ उपविभाग प्रमाणे अधिकाऱ्यांचे टेबल लावण्यात आले होते. त्यात कोणत्या उपविभागात कोणते गाव समाविष्ठ आहेत याचे फ्लेक्स लावले होते. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी सोय होत होती. तसेच ग्राहकांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
सदर मेळाव्यात ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १० तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यात तर १७ तक्रारी या येत्या ३ दिवसात सोडविण्यात येतील व १३ तक्रारी येत्या ७ दिवसात सोडविल्या जाणार आहेत तसेच उर्वरित १७ तक्रारी या शासकीय धोरणाशी सबंधित असअसल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी दिली. सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले.