मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज झालेल्या मनसेच्या अधिवेशनातून हिंदुत्वाची भूमिका घेण्याचे संकेत दिले असून त्यावर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच देशात प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आहे. काही लोकांना आता हिंदुत्वाची पालवी फुटली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
मनसेचं आज गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन पार पडत आहे. यावेळी मनसेने शिवमुद्रा असलेल्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती. यावरून मनसेचं भगवीकरण होत असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. या देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला. हिंदुत्वाचा विचार देशाला अभिप्रेतच होता. बाकी सगळं ठीक आहे, आता काही लोकांना पालवी फुटली आहे. फुटू द्या. पण, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही. म्हणून फक्त २३ जानेवारीलाच नव्हे तर रोजच महाराष्ट्रासह देशात बाळासाहेबांचे स्मरण होत असते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.