मुंबई – मनसेचा नेता म्हणून माझी निवड झाली असली तरी मला तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत काम करायचं आहे. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या १० टक्के काम मला करता आलं तरी खूप आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसेचे नवनिर्वाचित नेते अमित ठाकरे यांनी आज दिली.
मुंबईत सुरू असलेल्या मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी राजकारणात अधिकृतरित्या सक्रिय होणार आहे, हे मला कालपर्यंत मीडियातूनच समजत होतं. काल संध्याकाळी पाच वाजता साहेबांनी मला याबद्दल कल्पना दिली. अधिवेशनात मला शिक्षणासंदर्भात ठराव मांडायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. रात्री एक वाजता झोपलो आणि तीन वाजता उठलो. विश्वास ठेवा, मला नीट झोपही लागली नाही. राज ठाकरेंचा मुलगा म्हणून माझ्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा असणार. विशेषत: भाषणाच्या बाबतीत. त्याचा दबाव आला होता,’ अशी कबुली अमित यांनी दिली.