अहमदनगर – ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरणाईंशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी हे युवा आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते. गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी आपल्या खास स्टाइलनं गुप्ते यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाबद्दलचा अजेंडा रोहित यांनी यावेळी मांडला. ‘मी नगर जिल्ह्यातला आमदार आहे. त्यामुळं माझं प्रेम संपूर्ण जिल्ह्यावर आहे. त्यामुळं जास्त प्रेम संगमनेरवर की प्रवरानगरवर, असा प्रश्नच येत नाही. प्रामाणिकपणं काम करत राहणार,’ असं ते म्हणाले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर काम करणं सोपं आहे. हे आपल्यातील लोक वाटतात,’ असंही त्यांनी सांगितलं.