मुंबई – ‘प्रत्येक घटनेकडं शांतपणे पाहणाऱ्या व त्यावर संयमी प्रतिक्रिया देणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचा धक्का वगैरे बसत नाही,’ असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितलं.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरणाईंशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी हे युवा आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते. गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. यावेळी ‘रॅपिड फायर’ फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली.
अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत,’ असा टोला त्यांनी भाजपला हाणला.