- पाचोरा पीपल्स बँक निवडणूक – विश्लेषण
पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवार ता 13 रोजी सायंकाळी उशिराने जाहीर झाला . बँकेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवणारा हा निकाल ठरला आहे . सहकार पॅनलने हा इतिहास नोंदवला . गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून सत्ताधार्यांच्या विरोधात संचित झालेल्या व एकवटलेल्या असंतोषाच्या उद्रेकामुळे सत्ताधारी अशोक संघवी यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनल चे विमान कोसळून भुईसपाट झाले . सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांसह एकत्र आलेल्या असंतुष्टांचा विजयोत्सव कमालीचा आनंददायी होता . सभासद ,कर्मचारी, व मतदार यांच्याशी अध्यक्ष व चेअरमन यांचे वागणे, बोलणे अयोग्य व अपमानास्पद असेल तर सत्ता कशी हातातून जाते ही शिकवण या निवडणुकीतून साऱ्यांनाच मिळाली आहे .
पाचोरा पीपल्स बँकेचे मुख्य कार्यालय पाचोरा येथे असले तरी या बँकेचा विस्तार पाचोरा तालुक्यासह भडगाव , जामनेर , जळगांव तालुक्यात झालेला आहे .पाचोरा, भडगाव, नगरदेवळा ,जामनेर ,शेंदुर्णी व जळगाव येथे बँकेच्या शाखांचा विस्तार आहे . त्यामुळे बँकेच्या प्रत्येक घडामोडीवर, उलाढालीवर पाचोरा, जामनेर ,जळगाव ,भडगांव तालुक्यातील व मतदारसंघातील सामाजिक ,राजकीय ,आर्थिक, घडामोडींचा चांगला-वाईट परिणाम जाणवतो . बँकेची संचालक संख्या रिझर्व बँकेच्या नव्या धोरणामुळे कमी झाली आहे . तसेच सभासद संख्येतही लक्षणीय घट झाली आहे . प्रचंड आर्थिक वैभवात असलेल्या या बँकेवर गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून अशोक संघवी यांचे नेतृत्व व वर्चस्व होते . गतकाळात बँके वर आलेले आर्थिक संकट अशोक संघवी यांच्यामुळेच दूर झाले हे वास्तव सत्य असले तरी अशोक संघवी यांनी आपल्यासोबत कार्यरत असलेले संचालक, ठेवीदार ,कर्जदार , बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुयोग्य रीतीने संबंध ठेवणे आवश्यक असतांना त्यांनी सातत्याने केलेला त्यांचा अवमान ,अपमानास्पद बोलणे व मनमानी करणे या स्वभाव गुणांमुळे अनेकांचा रोष व संतोष ओढवून घेतला .संघवी हे ज्या ज्या वेळी चेअरमन बनले त्या त्या वेळी कमी-जास्त प्रमाणात संचालकांनी आपले राजीनामे दिल्याचा इतिहास आहे . परंतु त्यावेळी संचालक मंडळाची सदस्य संख्या जास्त असल्याने सत्ताधारी अल्पमतात येत नव्हते . परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी अशोक संघवी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळातील दिग्गज आठ संचालकांनी एकाच वेळी जिल्हा सहकार निबंधकांकडे राजीनामे सादर केल्याने बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली . त्यास अशोक संघवी यांनी आव्हान दिले . त्यामुळे हे प्रकरण विभागीय निबंधक, विभागीय आयुक्त, सहकार मंत्रालय व औरंगाबाद खंडपीठा पर्यंत पोहोचले . बँक आपल्याच ताब्यात राहावी म्हणून संघवींनी सर्वार्थाने प्रयत्न केले . त्यात त्यांना कधी यश तर कधी अपयश आले . परंतु कर्ज प्रकरणात दुखावले गेलेले व संघवी यांच्या धोरणामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागणारे संदीप महाजन यांनी योग्य त्या कागदपत्रांची जमवाजमव करून औरंगाबाद खंडपीठा मार्फत गुन्हा नोंदवला . त्यामुळे संघवी यांना काही दिवस बाहैर रहावे लागले . त्यांना नंतर जामीनही मिळाला . दरम्यानच्या काळात अशोक संघवी यांच्याशी सीए असलेले अॅड अतुल संघवी यांच्यात काही सामाजिक प्रश्नांवरून वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला .
निवडणूक काळात आमदार किशोर पाटील ,माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ यांचे सह शांताराम पाटील, सीताराम पाटील,व्ही टी जोशी, सतीश चौधरी, मूकूंद बिल्दीकर, डॉ जयंत पाटील, सीए प्रशांत अग्रवाल यासारखे माजी दिग्गज संचालकही दुखावले गेले . योगायोगाने प्रशांत अग्रवाल यांना काही काळ प्रशासक पदी राहण्याची संधी मिळाली .या संधीचे अग्रवाल यांनी खऱ्या अर्थाने सोने करून घेतले व संघवी यांच्या कार्यकाळात झालेली कर्जप्रकरणे, अनियमितता, अवाजवी खर्च ,वसुलीतील दुजाभाव, कर्ज मंजुरी व वसुली यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला . तसेच बँकेचे सीईओ नितीन टिल्लू यांच्यावर निलंबनाची कारवाई केली .दोन कर्मचाऱ्यांनाही निलंबित केले . काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या तर काहींची चौकशी सुरू केली . त्यामुळे बँक प्रचंड चर्चेत आली . मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढल्या .
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजीनामा दिलेले संचालक, माजी संचालक .अभ्यासू सभासद यांनी बँकेतील विविध व्यवहारा संदर्भात व नोकर भरती विषयां वरून प्रशासकां समोर अक्षरशः आक्रोश केला व न्यायाची मागणी केली . त्याआधारे काही ठराव करण्यात आले त्या ठरावांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँकेचे अधिकारी व काही कर्मचारी यांना धडकी भरली . अशा परिस्थितीत सहकार निबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .बँकेवर आलेले आर्थिक संकट व निवडणुकीसाठी होणारा सुमारे पंचवीस लाखांचा खर्च या गोष्टी विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशा प्रकारची मागणी बँक वाचवण्यासाठी अनेकांकडून करण्यात आली . परंतु त्या मागणीचा गांभीर्याने कोणी विचार केला नाही . सुमारे पंधरा जागांसाठी सुमारे 90 उमेदवारी अर्ज दाखल झाले . माघारीच्या मुदतीत अनेकांनी माघार घेतल्याने दोन अपक्षांसह फक्त 32 उमेदवार रिंगणात राहिले . अनिल येवले या अपक्षउमेदवाराने आपली उमेदवारी कायम राखली परंतु दुसर्या अपक्षाने अशोक संघवी यांच्या नम्रता पॅनलला पाठिंबा दर्शवला .
अशोक संघवी यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनल व अशोक संघवी यांचे चुलत भाऊ व त्यांचे कट्टर वैरी अॅड अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले .एखाद्या मोठ्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत प्रथमच प्रचार यंत्रणा राबवण्यात आली .डिजिटल बॅनर युद्ध, मतदारांशी संपर्क या सह सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत साम-दाम-दंड-भेद नीतीच्या सर्वार्थाने वापर झाला . विशेष म्हणजे दोन्ही पॅनेलमध्ये आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते उमेदवारी करीत असले तरी अर्थकारणात राजकारणाचा प्रवेश नसावा या उदात्त हेतूने कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा प्रचार या निवडणुकीत झाला नाही .परंतु सहकार पॅनेलच्या माध्यमातून गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून अशोक संघवी यांच्या नेतृत्वामुळे असंतुष्ट झालेले सगळे एकत्रित आले . त्यात माजी संचालक, राजीनामा दिलेले संचालक, बँकेतून निवृत्त झालेले कर्मचारी ,ज्या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले ते कर्मचारी, अतुल संघवी यांचे नातलग अन्याय व आर्थिक नुकसान सहन केलेले कर्जदार ,ठेवीदार यांनी एकत्र येऊन अशोक संघवी यांच्याविरोधात अक्षरशः मोट बांधली . उघड व छूप्या पद्धतीने अनेकांनी प्रचारात सक्रिय भाग घेतला . एकूणच प्रचार यंत्रणेत सहकार पॅनल मार्फत संजय राऊत यांचेसारखी भूमिका संदीप महाजन यांनी अत्यंत निर्भयतेने व सडेतोडपणे बजावली . सोशल मीडिया वरून त्यांनी आरोप-प्रत्यारोपांची अक्षरशः जुगलबंदी केली व समोर येऊन आरोपांबाबत खुलासा करण्याचे व देण्याचे उघड आव्हानही केले .हे आव्हान कोणी स्वीकारले नसले तरी या प्रचाराचा मतदारांवर चांगलाच परिणाम झाला .
शेंदुर्णी व जामनेर चे मतदार संघवी यांच्याविरोधात एकवटले .संघवींच्या नेतृत्वामुळे व वक्तव्यामुळे दुखावलेले, आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले अनेक दिग्गज प्रचारात सहभागी झाले .
नम्रता पॅनलचे ‘ विमान’ व सहकार पॅनलची ‘ कपबशी ‘ यांची प्रचारात कमालीची जुगलबंदी रंगली . दोन्ही पॅनल मध्ये आजी-माजी संचालकांसह नवख्यांचा समावेश होता .परंतु सहकार मध्ये विविध क्षेत्रातील नामवंत उमेदवार एकत्र आलेले होते . तसेच संघवी यांच्या विरोधात असंतुष्ट असलेल्या अनेकांनी सहकारला पूर्णतः सहकार्य केले .सभासद मला पुन्हा संधी देतील असा अतिआत्मविश्वास अशोक संघवी यांनी शेवटपर्यंत जोपासला . पॅनल टू पॅनल मतदान होणार नाही .मतदानात क्रॉसींग होईल अशी वक्तव्य व भाकिते केली जात होती . परंतु संघवी यांच्या विरूध्दच्या असंतोषाचा उद्रेक इतका प्रचंड होता की मतदारांनी व्यक्ती नव्हे तर चिन्ह पाहून सहकारला पसंती देत पॅनल टू पॅनल मतदान केले . त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीत एक हजाराच्या आसपास असलेली तफावत शेवटपर्यंत कायम राहिली . व सहकार पॅनलला सर्वच्या सर्व पंधरा जागांवर प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळाला . भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघातील विकास वाघ हे 3855 मते घेऊन आघाडीवर राहिले दुसऱ्या क्रमांकाची मते मुकुंद बिल्दीकर यांच्या सौभाग्यवती मयुरी बिल्दीकर यांना तर तृतीय क्रमांकाची मते अॅड अतुल संघवी यांना मिळाली .
आमदार किशोर पाटील यांचे जिवश्य कंठश्य मित्र मूकुंद बिल्दीकर यांनी सहकार पॅनलची पताका सर्वार्थाने खांद्यावर घेवुन जंग जंग पछाडून आपल्या अपमानाचा हिशोब चूकविला . अपक्ष उमेदवार अनिल येवले यांच्यामुळे सर्वसाधारण मतदारसंघात 556 मते बाद झाली . इतर मतदारसंघातही बाद मतांची सरासरी 150 पर्यंत होती .
पीपल्स बँकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात मतांच्या एवढ्या फरकाने संपूर्ण पॅनल निवडून येण्याची ही पहिलीच निवडणूक असून यामागे सत्ताधारी चेअरमन व नम्रता पॅनलचे प्रमुख अशोक संघवी यांचा स्वभाव, त्यातून दुखावले गेलेले व असंतुष्ट झालेले संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार ,कर्मचारी ,अधिकारी ही कारणे महत्त्वाची ठरली . मतमोजणीनंतर सहकार पॅनल ने काढलेल्या मिरवणुकीत या असंतुष्ठांनची मांदियाळी पाहायला मिळाली .
एखाद्या आर्थिक संस्थेचे नेतृत्व करीत असताना जर आपण एककल्ली स्वभाव ठेवला व सर्वांची मते घेऊन कामकाज केले नाही व आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न केला तर मतदार कशी धोबीपछाड मारतात हे या निवडणुकीतून सिद्ध झाले . याची जाणीव प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या सहकार पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांनी व संभाव्य पदाधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत ठेवणे आवश्यक आहे .अन्यथा यावेळी अशोक संघवी यांच्या संदर्भात जे घडले त्याची पुनरावृत्ती पुढील काळात होण्यास वेळ लागणार नाही .