जबलपूर- जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा शहा यांनी दिला.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी शहा यांनीकलम ३७० रद्द करणे, एनआरसी आदी मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य केलं. जेएनयूमधील आंदोलनावरही शहा यांनी भाष्य केलं. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं की नको, अशी विचारणा त्यांनी सभेला उपस्थित असणाऱ्या जनतेला केली. त्यानंतर राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असंही शहा म्हणाले.