मुंबई – राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
मानखुर्द येथील प्रभाक क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. विठ्ठल लोकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला. लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली.