क्वालालंपूर – लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या भारताच्या सायना नेहवालने गुरुवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाने दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर २५-२३, २१-१२ असा विजय मिळवला.
दक्षिण कोरियाच्या खेळाडूविरुद्धचा हा सायनाचा पहिलाच विजय ठरला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत यंगने सायनाचा पराभव केला होता. आता सायनाचा मुकाबला ऑलिंम्पिक सुवर्ण पदक विजेती कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. याआधी बुधवारी भारताच्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जगज्जेती आणि सहाव्या मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्स्काया हिचा ३५ मिनिटात पराभव केला होता. सिंधूने कोसेत्स्कायावर २१-१५, २१-१३ अशी मात केली होती. तर सायनाने बेल्जियमच्या बिगरमानाकिंत लियाने टॅन हिचा ३६ मिनिटात २१-१५, २१-१७ असा पराभव केला होता.
सिंधू आणि सायना यांनी स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली असली तरी पुरुषांमध्ये बी.साईप्रणित आणि किदम्बी श्रीकांत यांना मात्र सलामीच्या सामन्यातच पराभवाचा धक्का बसला. साईप्रणितला डेन्मार्कच्या रासमस गेमकेने तर श्रीकांतला चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन टेनने पराभूत केले. साईप्रणित आणि श्रीकांतचा पराभव झाला असला तरी एच.एस.प्रणॉय याने जपानच्या कांटा सुनेयामाचा २१-९, २१-१७ असा पराभव कर दुसरी फेरी गाठली.