जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचा निकाल विद्यापीठाने नुकताच जाहीर झाला. यात नुतन मराठा महाविद्यालयाला घवघवीत यश मिळाले असून एकूण १३ स्पर्धकांची विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत निवड झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या आयोजनाचा मान येथील नूतन मराठा महाविद्यालयाला मिळाला होता. या स्पर्धेत विद्यापीठाने विविध शाखेतील तज्ञ व्यक्ती या स्पर्धेच्या परीक्षणासाठी नियुक्त केले होते. यात एकूण सहभागी स्पर्धकांपैकी 129 स्पर्धक संघांची विद्यापीठात ८ व ९ रोजी होणा-या विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यात विशेष बाब म्हणजे नूतन मराठा महाविद्यालयातील 13 स्पर्धक संघांची निवड या स्पर्धेसाठी झाली. यात भाषा आणि मानव्यविद्या या शाखेतील ४ विद्यार्थी, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांच्यातील १ व विज्ञान विभागातील ८ संघांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संघात दोन स्पर्धकांचा समावेश होता.
यात भाषा व मानवविद्या शाखेतील शेख वकार अहमद रियाझउद्दीन यांनी पदव्युत्तर संवर्गातून उर्दू कवितेतील बिगर मुस्लिम लोकांचे योगदान यावर पोस्टर, देवयानी बेंडाळे यांनी पदव्युत्तर या संवर्गातून वर्ल्ड क्लाउड या शीर्षकाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने इंग्रजी न शिकता ते चित्र व आकृत्यांच्या माध्यमातून शिकवल्यास विद्यार्थ्यांना पटकन आकलन होते, हे मांडले होते. जागृती प्रदीप पाटील यांनी पदवी या संवर्गातून पोस्टरच्या माध्यमातून आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियावर ज्या नेट भाषेतून संक्षिप्तरित्या इंग्रजीचा वापर केला जातो त्याचा त्या इंग्रजी भाषेला भविष्यात धोका आहे असं सादर केलं होतं. सरला सपकाळे यांनी पदव्युत्तर संवर्गातून खेळ गीतांतुन व्यक्त होणाऱ्या स्त्री भावना या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. वाणिज्य आणि व्यवस्थापन मधील पल्लवी शिंपी हिने पदव्युत्तर गटातून जीएसटीवर पोस्टर सादर केले होते. त्यात त्यांनी जीएसटीबद्दल तळागाळातील लोकांना माहिती पोहचवावी व त्याबद्दल गैरसमज दूर व्हावे असे मांडले होते.
विज्ञान विभागातून पल्लवी ठाकूर हिने सपोटा म्हणजे चिकूच्या पावडरपासून बिस्कीट बनविले व ते डायबेटीस व कॅन्सरला कसे फायदेशीर आहेत हे पोस्टर व मॉडेलच्या माध्यमातून दाखवले. रिद्धी पाटील यांनी पपईपासून कॅण्डी तयार केली व ती शरीरातील पेशी वाढवण्यासाठी कशी काम करते हे पोस्टरने दाखवले. नंदा गवळी यांनी जनावरांना दिला जाणारा ऍझोला चारा हा जनावरांचा दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटॉक्सि इंजेक्शनपेक्षा कसा चांगला आहे ते मॉडेलद्वारा सादर केले. दुर्गादेवी ठाकूर यांनी मॉडेलच्या माध्यमातून मॅजिक बॉल हा मुरमाळ जमिनीला शेती बनविण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे सादर केलं. प्रज्ञा पाटील पोस्टरने यांनी माशांच्या खवल्यापासून गम पेस्टची कशी निर्मिती करता येईल ते सांगितले. जितेंद्र महाजन याने पोस्टरद्वारा टोमॅटो पासून लायकोपेन नावाचे द्रव्य कसे वेगळे करता येते यावर सादरीकरण केले. ऋषीकेश निकम याने वेब सेन्सर विषयी सादरीकरण केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, उपप्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, उपप्राचार्य प्रा.आर.बी देशमुख, प्रा.एस.ए.गायकवाड तसेच शिक्षक वृन्दांनी अभिनंदन केले आहे.