मुंबई – दादर येथील इंदू मिल परिसरात भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साकारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक २०२२ पर्यंत पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर शेजारील इंदू मिलमध्ये जाऊन स्मारकाच्या कामाच्या पाहणी केली आणि स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला.
स्मारकाला काही परवानग्या बाकी आहेत. त्या या महिन्यात तत्काळ दिल्या जातील. स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी योग्य ती तरतूद केली जाईल. २०२२ पर्यंत स्मारक जनतेसाठी खुले असेल, असे पवार यांनी सांगितले.
यूपीए सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या मालकीची इंदू मिलची साडेबारा एकर जमीन स्मारकाला विनामूल्य दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये स्मारकाच्या कामाची पायाभरणी केली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे स्मारकाच्या उभारणीचे काम दिले आहे. २०२० पर्यंत स्मारक होईल, असे वचन फडणवीस सरकारने दिले होते. मात्र, ६५० कोटींच्या स्मारकाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५० फूट उंच पुतळा या स्मारकात उभारण्यात येणार आहे.