जळगाव,(प्रतिनिधी)-: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बोगस बियाणे सापडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून सुमारे १७ लाख ८२ हजार २०० रुपयांचे एचटीबीटी कंपनीचे बोगस कापूस बियाणांची एक हजार २७३ पाकिटे जप्त करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईने जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्री करणाऱ्या गोटात मोठी खळबळ उडाली असून बोगस बियाणे विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. कृषी विभागाचा जिल्हा भरारी पथक नेहमीच ‘ऍक्शन मोड’ असल्याने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीचे धाबे दाणाणले आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे व कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलिस कर्मचारी विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांनी केली.
काय आहे नेमकं प्रकरण
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी यांच्या अकुलखेडा रस्त्यावरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापसाच्या बियाणाची एक हजार २७३ पाकिटे जप्त केली. याबाबत जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदलाल चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे तपास करीत आहे.
बियाण्याच्या पिशवीवर ही माहिती नाहीचं
जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने पकडलेल्या बियाणेच्या पिशवीवर उत्पादन तारीख, समाप्ती तारीख, बॅच क्रमांक, वजन, प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचे नाव आणि पत्ता दिसून आला नाही.प्रमाणित बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणित किंवा सत्यता दर्शक प्रमाण पात्राची माहिती अत्यावशक असते.बोगस बियाण्यांचीअंकुरण दर (Germination rate) कमी असते पेरल्यानंतर फार कमी टक्केवारीने उगम होतो किंवा अजिबात अंकुरत नाही यामुळे शेतकरी फसतो आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं शेतकऱ्यांना या फसवणूकी पासून संरक्षण मिळावे म्हणून जिल्हा कृषी विभागाचा भरारी पथक कायम सतर्क असते.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना काय करावे?
• सरकारी बियाणे विक्री केंद्र किंवा विश्वासार्ह सहकारी संस्था यांच्याकडूनच बियाणे खरेदी करावे.
बियाणे खरेदी करताना अधिकृत, नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी.
• बियाणे खरेदीची पावती (Receipt) ठेवा, जेणेकरून काही अडचण आल्यास तक्रार करता येईल.
• शंका आल्यास बियाणे तपासणीसाठी कृषी अधिकारी, बियाणे तपासणी प्रयोगशाळा किंवा तालुका कृषि कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.खरेदी करताना बियाण्याचे बिल आणि पॅकिंगवरचे लेबल सांभाळून ठेवावे.
• बियाणे निकृष्ट असल्यास जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करावी.
• बियाण्याचे नमुने तपासणीसाठी द्यावेत.
बोगस बियाण्यांवरील नियम आणि कायदे
1. बियाणे अधिनियम, 1966 (Seeds Act, 1966):
• हे अधिनियम बियाण्यांचे उत्पादन, विक्री, साठवणूक, आणि गुणवत्ता यावर नियंत्रण ठेवतो.
• फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारांना देतो.
• बियाण्यांची तपासणी व विश्लेषणासाठी बियाणे निरीक्षक व प्रयोगशाळा यांची तरतूद आहे.
2. बियाणे नियम, 1968 (Seeds Rules, 1968):
• बियाण्यांची तपासणी, लेबलिंग, आणि साठवणूकबाबतची सविस्तर माहिती.
• लेबलवर पिकाचे नाव, उत्पादन वर्ष, अंकुरण्याची टक्केवारी, विक्रेत्याचे नाव इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.
3. जैविक विविधता कायदा, 2002:
• पारंपरिक बियाण्यांचे संरक्षण आणि त्यांचा गैरवापर रोखण्यास मदत करतो.
4. उत्पादक आणि विक्रेत्यांची जबाबदारी:
• जर बियाणे बोगस आढळले, तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी उत्पादक/विक्रेत्यावर असते.
• राज्य कृषी विभाग तक्रार घेतल्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करतो.दरम्यान जळगाव जिल्हा भरारी पथकातील सदस्य यांनी जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्री करणाऱ्या व जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.