नजरकैद न्यूज :- जवानाच्या अंत्ययात्रेदरम्यान वाहनात चढत असताना लोखंडी रॉड लागल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जखमी झाले. त्यांना डोक्याला इजा झाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील वरणगाव ता. भुसावळ येथे गुरुवार दिनांक २७ रोजी घडली.
वरणगाव येथील रहिवासी असलेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर (३३) हे २५ मार्च रोजी आसाम राज्यातील लेखापली येथे कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा तिरंगा चौकात आली. त्यावेळी सैनिकाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तसेच पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे पार्थिव असलेल्या वाहनात चढत असताना त्याचवेळी वाहनाचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना क्षणभर भोवळ आली.त्याच स्थितीत मंत्री महाजन यांनी जवान बाविस्कर यांच्या पार्थिवावर – पुष्पचक्र अर्पण केले. नंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. नंतर जवानाच्या परिवाराला भेटून त्यांचे सांत्वन केले. यानंतर बैठकीसाठी तातडीने ते नाशिककडे रवाना झाले.