जळगाव : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी वनहक्क धारक शेतकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मसाला क्लस्टर’ तयारी करण्यासाठी जैन इरिगेशन प्रा.लि. जळगाव यांच्याशी सामंजस्य करार करण्याबाबत शासकीय यंत्रणेचे जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख, संबंधित तालुका कृषी अधिकारी व जैन इरिगेशनचे पदाधिकारी यांच्या समवेत पेसा क्षेत्रामध्ये ‘मसाला क्लस्टर’ तयार करणेबाबत बैठक आज संपन्न झाली.
पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र) जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेल्या वैयक्तिक वनहक्क धारक (आदिवासी शेतकरी) यांच्या शेतातील उत्पन्न वाढवून त्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी, आदिवासी भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात मिरची, हळद, टमाटर, अद्रक, लसून, कांदा लागवड करून त्यांच्या शेतातील मालाला करारनाम्यानुसार, हमी भाव मिळवून देण्याकरिता स्पाइस क्लस्टर तयार करण्यात येत आहे.
ही योजना राबविण्याकरिता व पेसा क्षेत्रातील वनहक्क शेतकऱ्यांना दोन टप्यात योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी दिनांक १९ मार्च, २०२५ व २० मार्च, २०२५ रोजी असे दोन दिवस जैन इरिगेशन प्रा. लि. जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात मिरची, हळद, टमाटर, अद्रक, लसून, कांदा लागवड करून कमी वेळेत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
पेसा क्षेत्रातील (अनुसूचित क्षेत्र) जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेल्या वैयक्तिक वनहक्क धारक (आदिवासी शेतकरी) यांच्या गावनिहाय स्पाइस क्लस्टर दिनांक १० एप्रिल, २०२५ पर्यंत तयार करण्याबाबत लोक समन्वय प्रतिष्ठान संस्थेच्या सहाय्याने कृषि विभाग (राज्यस्तर, आत्मा व जिल्हास्तर (जि.प.) यांना निर्देश देण्यात आले. तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता कृषी विभाग यांच्यामार्फत वार्षिक कृती आराखडा तयार करणेबाबतचेही निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत दिले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अधिनस्त झालेल्या आढावा बैठकीत ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना मोरे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल,
अरूण पवार, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, जळगाव, कुर्बान तडवी, व्यवस्थापक, अग्रणी बैंक, जळगाव,प्रणव कुमार झा,
अकलादे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प. जळगाव, प्रतिभा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या, श्रीमती व्ही. एस. जैन, वरिष्ठ भूवैज्ञानिक भू.स.वि.य. जळगाव, जैन इरिगेशन प्रा.लि. जळगाव चे पदाधिकारी डॉ. बालकृष्ण, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. व्ही. टी. भुकन, श्रीराम पाटील, अनिल जोशी, बालाश्री हाकडे, गौतम देसले व आदिवासी विकास निरीक्षक व आदिवासी शेतकरी उपस्थित होते.