जळगाव :– जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत जिल्हा नियोजन कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे ३३० पीडित शेतकरी कुटुंबांचे घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. यात आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे सामाजिक-आर्थिक आणि मानसिक घटक तसेच सरकारी मदतीतील तफावत स्पष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे.
सर्वेक्षणाद्वारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या मूलभूत गरजा ओळखून रोजगार निर्मिती, आर्थिक सुरक्षा, मानसिक आरोग्य समर्थन आणि सुधारित कृषी पद्धतींसाठी उपाय सुचवले जातील. हा अभ्यास ५ मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाणार आहे.