जळगाव, दिनांक 04(प्रतिनिधी) : – आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून लेंड अ हॅन्ड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन 2014-15 शैक्षणिक वर्षांपासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यातील १७९ आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ ते १२ वीपर्यंत व्यवसाय शिक्षण घेत आहेत.
लेंड अ हॅन्ड इंडियाच्या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता ६ ते ८ वी च्या 26 हजार 672 विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक अपर आयुक्तालयाच्या 11,825, ठाणे अपर आयुक्तालयाच्या 7,982, नागपूर अपर आयुक्तालयाच्या 3,016 तर अमरावती अपर आयुक्तालयाच्या 3,849 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 213 शासकीय आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. टप्याटप्याने उर्वरित आश्रमशाळा यात सामावून घेतल्या जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीपासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. अशी माहिती नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.
दरम्यान, सामंजस्य करराप्रसंगी आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) संदीप गोलाईत, सहआयुक्त (शिक्षण) संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. पाटील, अनिल महाजन, संस्थेचे उपसंचालक निलेश पुराडकर, उपव्यस्थापक राजेश्वर गायकवाड, कौशल्य शिक्षण अधिकारी उमेश गटकळ, यूएनडीपीच्या अमृता भालेराव आदी उपस्थित होते.