महापुरुषांचा जन्म हा लौकिक स्वरुपातच होतो. मात्र आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने ते अलौकिकपद प्राप्त करतात. त्यांचा जीवन प्रवास हा काही ठरवून आलौकित्व प्राप्त करण्याकडे नसतो, तर ती एक त्यांच्या हातून घडत जाणारी क्रिया असते. जी स्वाभाविक असली तरी त्यासाठी त्यांनी स्वतःला नित्य घडविले असते. त्यांच्या आचरणातून समाजाची घडण आणि सर्वतोपरी जोपासना होत असते. प्रत्येक क्षण हा त्यांचा समाजाला वाहिलेला असतो, धर्माला वाहिलेला असतो. हा धर्म मानवता जपणारा असतो, विश्वव्यापक असतो. त्यातून निर्माण होतो एक इतिहास जो मानवी मनावरून कधीही पुसला जात नाही. त्यांनी एक अढळवद प्राप्त केलेले असतं एका ध्रुवासारखं.असच एक व्यक्तिमत्व म्हणजे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज.
अध्यात्माची आवड असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात महाराजांचा जन्म झाला. त्यांचा बालपणीचा काळ मोठा संघर्षाचा राहीला. आई-वडिलांचा संघर्ष त्यांनी पाहिला, अनुभवला. या संघर्षातही कुटुंबियांकडून ईश्वरभक्ती जोपसल्या जात होती. महाराजांचे जन्मनाव ‘रामदास’. सर्व भावंडाची नावे ही संतावरुनच ठेवलेली. त्यावरुनच कुटुंबाचा स्वभाव कळतो. घरची परिस्थिती अतिशय बिकट इतकी की, प्राथमिक शिक्षणासाठी बोडींगमध्ये राहावे लागले. हा संघर्ष पिंपळगाव गोलाईत या गावाने अनुभवला. हे गाव महाराजांच्या वडिलांच्या मामाचे गाव. वडिलांच्या घरची बिकट परिस्थिती म्हणून ते मामाच्या गावी आले. मात्र जीवन जगण्याचा संघर्ष इथेही सुरुच होता. वडील दिव्यांग, वडिलांना काठी शिवाय चालता येत नाही. अशा परिस्थितीत वडिलांची तल्लख बुद्धिमत्ता आणि आईची धिरोदत्तवृत्री यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंद मानूण मुलांची योग्य जडण-घडण ते करीत होते. माता-पित्याचा हा संघर्ष ‘बाल रामदास’ बघत होता, अनुभवत होता. जीवनावरील निष्ठा वाढ होती, आई-वडिलांवरील प्रेम परमोच्च क्षण गाठत होते.
फैजपूर येथील सत्पंथ मंदिराचे ११ वे गादीपती प.पु. जगन्नाथ महाराज यांचे पिंपळगाव येथे नेहमी येणे- जाणे असायचे. कारण या गादीशी या गावाचेही एक नाते होते. अगदी जुने. पू. जगन्नाथ महाराज त्याच नात्याला निष्ठेने निभावत अधून-मधून पिंपळगाव येथे यायचे. सत्पंथाची पूजा-अर्चा करायचे. महाराजांचे वडील वृत्तीने अध्यात्मिक त्यामुळे जगन्नाथ महाराजांचा मुक्काम अनेकदा त्यांच्याकडेच असायचा. लहानग्या रामदासाच्या चेहऱ्यावर अस्तामिक तेज होते. ते जगन्नाथ महाराजांनी पाहिले. सत्पंथांच्या गादीचा भावी वारस त्यांना या तेजस्वी मुलात दिसू लागला. फैजपूरची गादी ती ब्रम्हचारी, ब्रम्हचर्य हे असिधाराव्रत. ते पेलणे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे. त्यांना त्यासाठी रामदास सुयोग्य वाटला. तेव्हा हा मुलगा मला पाहिजे हे कसे सांगावे हे त्यांना कळेना. मात्र एक दिवस ते फैजपूरहून पिंपळगाव येथे मनाचा निश्चय करुनच आले. ईमामशहा महाराजांचे स्मरण केले आणि विषयाला हात घातला. ‘मला सत्पंथ गादीसाठी रामदास हवा!’ हे त्यांच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य. झाडावरुन एखादं सुवासिक फुल पडावं आणि झेलणाऱ्याने ते नाजूक हातांनी अलगद झेलावं तसं लहेनसिंह मामांनी ते झेललं. तो दिवस ‘रामदास’ च्या अलौकिक आणि ऐतिहासिक कार्य करण्याकडे सुरु होणाऱ्या प्रवासाचा टर्निंग पॉईंट ठरला.
एखादं पुस्तक वाचावं आणि संपवावं एवढा हा प्रवास निश्चितच वाटावा तसा सोपा नाही. अजिबात नाही. पोटच्या मुलाला कायमस्वरुपी एका ब्रम्हचारी गादीला सुपुर्द करावं, त्या मुलानेही आई-वडिलांचा कायमसाठी दुरावा सहन करण्याची शक्ती मनात बाळगावी. हे सारं काही अलौकिक. फैजपूरला जायचा क्षण तर फार मोठा कठीण. सारा गाव ‘रामदासला’ सोडायला बस स्टँडवर आलेला. तेजस्वी चेहऱ्याच्या रामदासच्या मनात प्रचंड घालमेल, समुद्रात
वादळं उठावी अगदी तशी, परंतु आई-वडिलांचा संघर्ष, त्यांची ईश्वर निष्ठा अनुभवलेल्या रामदासाने नकळत्या वयातही जो समजुतदारपणा दाखवला तो अवर्णनीय. मी रडलो, तर आई रडेल, या जाणिवेने आहे ते दुःख मनातच ठेवलं. जरासही बाहेर येऊ दिलं नाही. सारा गाव त्या विरहानं रडत होता. मात्र रामदास जणूकाही अबोलपणे त्यांनाच समजावत होता. ब्रम्हचर्य काय असत? हे नकळणाऱ्या वयात ते व्रत स्वीकाराणारा सर्वांचा लाडका रामदास आता एका वेगळ्या प्रवासाला निघाला…. दि. २२ डिसेंबर १९९७ रोजी त्यांनी गुरु जगन्नाथ महाराज यांच्याकडून
सत्पंथाची दीक्षा घेतली. लौकिकाकडून अलौकिकाकडचा प्रवास सुरु झाला तो येथूनच.
प.पु.गुरु जगन्नाथ महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व. मनोभावे सत्पंथाची सेवा करीत मंदिराची व्यवस्था बघत होते इथेही संघर्षच होता. मंदिराच्या कामासाठी मैलोगनती पायी चालून जात त्यांचीही सेवा सुरु होती. एका उत्कृष्ट शिष्यकाराने एका सुंदर शिल्पाची निर्मिती करावी तशी घडण रामदासची सुरु झाली. पहिला टप्पा होता तो रामदास हे नाव बदलून जनार्दन हे नाव धारण करण्याचा. त्या क्षणी रामदास जर्नादन महाराज झाले. एका आईने सांभाळ करावा तसा जगन्नाथ महाराजांनी जनार्दन महाराजांचा सांभाळ केला. जगन्नाथ महाराजांजवळ एक चित्रकलेची अलौकिक प्रतिभा होती. आजही मंदिरात भिंतीवर अतिसूक्ष्मपणे रेखाटलेली दशावतावरील चित्रे त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
जनार्दन महाराजांच्या तारुण्यात प्रवेश करण्याच्या काळातच दि. १४ डिसेंबर २००१ रोजी जगन्नाथ
महाराजांनी जगाचा निरोप घेतला. महाराजांचा एकमेव आधार हरपला. सारी जबाबदारी अंगावर येऊन पडली. मायेने डोक्यावरून हात फिरवणारं छत्र हरपलं ते कायमच. ज्या गादीचा वारसा हाती घेतला तिथे दुःख व्यक्त करायचीही सोय नाही. आभाळच फाटलं. मात्र जगन्नाथ महाराजांनी घेतलेला अखेरचा श्वास हा त्या समाधानानं घेतलेला होता की, माझा जीवलग शिष्य आता जबाबदारी सांभाळायला परिपूर्ण बनला आहे. एका महामेरु प्रमाणे अविचत्त बनला आहे. इकडे जनार्दन महाराजांच्या मनातली वादळे शांत होत नव्हती. त्यांना तो दिवस आठवला. ज्या दिवशी सारा गाव आपल्याला बसस्टँडवर सोडत असताना मनात चालेलली वादळं आणि आता आई-वडील दोघांचही प्रेम देणारे गुरुश्रेष्ठ त्यांनीही जगाचा निरोप घ्यावा. परमेश्वरशक्ती प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला सत्वपरीक्षा बघत होती. हृदयावर प्रत्येक क्षणी घाव होतच होते. ते दाखविणं मात्र उचित नव्हतं. मनातली वादळं व्यक्त केल्यावरच शांत होतात. मात्र ती सांगावी कोणाला. ऐकणारा कोसळून पडण्याची दाट शक्यता होतं. त्यातूनच एक स्थितप्रज्ञ असं व्यक्तिमत्व घडत होतं.
स्वतःला सांभाळून ज्या धर्मकार्याला स्वतःला वाहून घेतलं आहे ते हाती घेणं गरजेचं होतं. आपला जन्म भौतिक सुख उपभोगण्यासाठी झालेला नाही. तो देशकार्य, धर्मकार्यासाठी झाला आहे. ही जाणीव क्षणभरही मनापासून दूर होऊ दिली नाही. या जाणिवेतूनच एकट्याने चालण्याची आता सवयच झाली होती.
महापुरुष ज्या वाटेने चालतात ती वाट राजरस्ता बनायला वेळ लागत नाही. गुरुंच्या निर्वाणानंतर जनार्दन महाराजांनी स्वतःला हाती घेतलेल्या कार्याला वाहून घेतले. मन संवेदनशील असल्याने धार्मिक कार्य करीत असतांनाच समाजातील दुःखे दूर करण्याचही काम सुरु ठेवलं. अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी फैजपूरचे मंदिर हे एक समाधानाचं पवित्र स्थळ बनलं धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महनीय लोकांशी संपर्क वाढला. सामाजातील तळागळातील लोकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांच्या अडचणी सोडवाण्यात हे एक संवेदनशील मनाचं फार मोठं लक्षण आहे. मानवता धर्म हा पहिला धर्म, यातूनच साऱ्या धर्माची निर्मिती झाली आहे. हा मानवता धर्म महाराजांनी आजवर मोठ्या निष्ठेने जोपासला आहे.
सत्पंथाची पताका महाराजांच्या वाणीतून अन् कार्यातून भारताच्या बाहेरही फडकायला लागली. अमेरिकेतील महाराजांचा भक्तांचा गोतावळा मोठा. तिथेही नित्य प्रवचन आणि मार्गदर्शन सुरु आहे. सत्पंथातील एक तेजस्वी, सात्विक व्यक्तिमत्व असलेले संत निरतीशय चांगलं काम करीत आहे, ही गोष्ट धार्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पसरत होती. चंदनाच्या झाडाला आपला सुगंध ओरडून सांगावा लागत नाही, त्याप्रमाणं ही कीर्ती सर्वदूर पसरत होती.
हरिद्वार येथील हंस देवाचार्यजी यांना तर महाराजांचा असा लळा लागला की, ते पूत्रवत प्रेम करायला लागले. मोठमोठी धार्मिक व्यासपिठे महाराजांच्या आगमनाची वाट बघायला लागले. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । या प्रमाणे अतिसंवेदनशील मनातील अखिल मानवजातीच्या हिताचा कळवळा आणि तळमळ मोठ मोठ्या व्यासपीठांवरून तेजस्वी वाणीतून व्यक्त होऊ लागली. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र यांना लाभलेल भारतीय संस्कृतीचं अधिष्ठान नष्ट होता कामा नये यासाठी मानवसेवा, गौसेवा, देशसेवा आणि धर्मसेवा यासाठी द्यावं लागणारं हवं ते योगदान वाणीतून आणि कृतीतून प्रगट होत होतं. या सर्व कार्याची दखल धार्मिक क्षेत्राने घेऊन त्यांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दि. १३ जानेवारी २०१३ रोजी ‘महामंडलेश्वर’ हा बहुमान दिला. त्यापाठोपाठ सत्पथरत्न हा ही बहुमान मिळाला. मात्र या बहुमानापाठोपाठ जबाबदारीचं ओझंही वाढत होतं. जया अंगी मोठेपण। तया यातना कठीण ।। या संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे मोठे परिश्रम महाराजांच्या वाट्याला आले. जगावर कोरोनाचा मोठा आघात झाला. यावेळी स्वतःची पर्वा न करता दुःखितांचे दुःख हलके केले. लोकांना या आजाराशी लढण्याचे बळ दिले. सारे जग स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करीत असतांना इतरांच्या जीवासाठी महाराज झटले. त्यांचे मनोबल मोठे त्यामुळे स्वतःची पर्वा न करता लोकांना वाचविण्यासाठीच मोठे प्रयत्न केले.
याच कोरोनाच्या पाश्वभूमीवर अखिल भारतीयाचं शेकडो वर्षाच अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण अयोद्धेत साजरा होणार होता. श्रीरामांच्या जन्मभूमीत रामलल्लाच्या मंदिराची उभारणी सुरु करण्यात येणार होती. हा कार्यक्रम मोजक्या संतांच्या आणि राजकीय लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार होता. त्यासाठी संबंध महाराष्ट्रातून केवळ आणि केवळ दोनच संतांना निमंत्रण दिल्या जाणार होतं. त्यात ‘महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज’ हे एक नाव होतं. श्रीरामांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या त्या कार्यक्रमाला महाराज उपस्थित राहिले हा क्षण आपल्या सर्वासाठीच परमोच्च आनंदाचा अन् अभिमानाचा क्षण ठरला.
कदाचित महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे नियतीनं आधीच ठरवलेलं होतं की काय म्हणून त्यांचं बालपणीच नाव ‘रामदास’ असं ठेवलं असावं. तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. अनेकवेळा पावलोपाऊली संघर्षही करावा लागला. मात्र या सर्व संषर्घाना नेहमी प्रसन्नचित्ताने तोंड देत मिळालेल्या जबाबदारीला यथोचित न्याय दिला. अखिल भारतीय संत समितीने कोषाध्यक्ष पद सांभाळतां हिंदू धर्मातील सर्व पंथीय संतांशी मैत्रीचे भावबंध जुळले. त्यातूनच फैजपूर या छोट्याशा गावी अखिल भारतीय संतसंम्मेलन यशस्वी केले. या संम्मेलनाच्या एक तपानंतर भव्यदिव्य असा समरसता महाकुंभही आयोजित केला. हे दोन्हीही समारोह भारतातील सर्व संताच्या पवित्र पदस्पर्श लाभण्याचा क्षण होता. या दोन्ही कार्यक्रमांना जे उपस्थित होते. त्यांचा अनुभव अवर्णनीय असाच आहे. भारतवर्षातील सर्व संत एका व्यासपीठावर आनणे ही सोपी किंवा सहजसाध्य होणारी गोष्ट नव्हती. मात्र एक तेजस्वी, प्रेमळ आणि चुंबकीय व्यक्तिमत्वाचा प्रभाव म्हणून हे सर्व शक्य झाले. पृथ्वीवर स्वर्ग अवतरण्याचा तो क्षण याचि देही याचि डोळा। बघण्याची अनुभूती अवर्णनीय आहे.
फैजपूरपासून थोड्या अंतरावर वडोदा नावाचे छोटे गाव आहे. या गावाच्या बाहेर एक सुंदर अशी इमारत लक्ष
वेधून घेते. ही इमारत म्हणजे महाराजांच्या स्वप्नातील एक सुंदर प्रकल्प होय. तुलसी हेल्थ केअर या नावाने निसर्गोपचार केंद्र आणि त्याला लागूनच सुंदर गोशाळा आहे. हे दोघेही प्रकल्प महाराजांचे अभिनव प्रकल्प होय.
आज महाराजांचे व्यक्तिमत्व वलयांकित आणि हृदयांकित असे दोन्ही स्वरुपाचे पूर्ण विकसित व्यक्तिमत्व म्हणून भारतभर सुपरिचित बनले आहे. मात्र त्या मागची त्यांची साधना फार मोठी आणि खडतर आहे. जी कुणाच्या नजरेस येत नाही.
असाध्य ते साध्य करिता सायास ।
कारण अभ्यास तुका म्हणे ।।
या अभंगांच्या ओळी प्रमाणे सतत चिंतन आणि परिश्रम हाच महाराजांचा अभ्यास आहे. जो आजही नित्य सुरु आहे. फैजपूरच्या आजूबाजूला असलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, वृक्षारोपण करणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ‘आईभवानी देवराई’ हा उपक्रम मला सूचला. त्यांच्या जवळ मी तो व्यक्त केला तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी प्रोत्साहन दिले, आशीर्वाद दिला. हे बळ घेऊनच या वृक्षांच्या लागवडीसाठी आणि जोपासण्यासाठी मित्रांच्या सहकार्याने धडपड करतो आहे.
मोठ्या आणि महान व्यक्तिबद्दल लिहितांना शब्दही कमी पडायला लागतात. हा लेख लिहितांना तशीच अनुभूती येते. महाराजांचे कर्तृत्व आता सातासमुद्रापार गेले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्याला ऐतिहासिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यांचा लौकिकाकडून अलौकिकाकडच हा प्रवास भव्य-दिव्य-अद्भुत असाच आहे. त्यामागची त्यांची कठोर साधना ही केवळ आणि केवळ त्यांनाच माहीत आहे.
महाराजांच्या या उत्तुंग कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम !
जय गुरुदेव ।
लेखक : डॉ. विश्वजीत भुजंगराव सिसोदिया