जळगाव,(प्रतिनिधी)– धरणगाव तालुक्यातील चामगांव ते चामगांव फाटा पर्यंत सुरु असलेल्या डांबरी रस्त्याचे सुरु असलेले काम निकृष्ट असल्याची तक्रार शंकरराव सावंत यांनी जिल्हा परिषद, उपविभागीय कार्यालय धरणगाव यांच्याकडे केली आहे. डांबरीकरण रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून केवळ ठेकेदारांना पोसले जात आहे का?असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाचे काम
चामगांव ते चामगांव फाटा,सावदा – रिंगणगाव डांबर रस्ता मार्गावरील केलेल्या कामाच्या दर्जावर गावातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डांबरीकरण रस्त्याचे काम व्यवस्थित न होणे, केलेले काम इतके तकलादू आहे की रस्ता पुर्ण होण्याच्या आधीच त्याची खडी बाहेर निघत असल्याने आणि साईड पट्ट्याची कमतरता यामुळे हा रस्ता धोकादायक ठरला आहे. या मार्गांवर दुचाकी चालवने अवघड झालं आहे.रस्ता पूर्ण होई पर्यंतही हा रस्ता टिकतो किंवा नाही याबाबत शंका आहे.रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो आहे .दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या होत असलेल्या निकृष्ट कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून आहे.
जनतेचा पैसा वाया जातोय
शंकर सावंत यांनी सदर रस्त्याच्या कामाबाबत तक्रार करत म्हटले की, “जनतेचा पैसा वाया जातो आहे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. हा रस्ता केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी तयार करण्यात आला आहे त्यातून लोकांचे फक्त नुकसानच झाले आहे.
देयके अदा करू नये
चामगांव ते चामगांव फाटा,सावदा – रिंगणगाव डांबर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट असून याबाबत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे.