जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामे देऊन विविध मागण्यांचे निवेदन
जळगाव ;- सन्मानाची वागणूक व विकास कामांसाठी योग्य निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील सर्व १५ पंचायत समिती सभापतींनी आपापले राजीनामे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे आज सोपवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . दरम्यान सभापतींनी ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असल्याचे कळते .
जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती व १३४ सदस्यांनी सामूहिक राजिनामा देण्याच्या निर्णय घेतला होता . त्यानुसार आज जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामे सोपविले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा बोदवड सभापती गणेश पाटील, पाचोरा बन्सीलाल रामदास पाटील ,भुसावळ प्रीती पाटील , अमळनेर वजाबाई नामदेव भिल,,चाळीसगाव स्मितल बोरसे , जामनेर निताताई पाटील,चोपडा आत्माराम म्हाळके ,मुक्ताईनगर शुभांगी भोलाणे , रावेर माधुरीताई नेमाडे , जळगाव यमुनाबाई रोटे , यावल पल्लवीताई चौधरी, भडगाव रामकृष्ण पाटील, एरंडोल ,धरणगाव , पारोळा येथील सभापती गैरहजर होते . उर्वरित सभापती आपले राजीनामे नंतर देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.
पंचायत समिती सभापती पद हे केवळ नामधारी असून कामधारी नसल्याने आणि विकासकामांसाठी सभापतींना डावलले जात असल्याचा आरोप सभापतींनी केला आहे . पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगानुसार पूर्वी प्रमाणे तरतूद करावी , नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे, विधान परिषदेला मतदानाचा हक्क द्यावा . , सदस्यांला विविध विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी देण्यात यावा सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मान्यता देण्याचा अधिकार असावा , यासह विविध १५ मागण्याचा यात समावेश आहे .