जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रचाराचा अखेरच्या टप्प्यात राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत प्राचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेना महायुतीकडून निवडणूक रिंगणात असलेले मंत्री गुलाबराव पाटिलांची आज दिनांक १७ रोजी पाळधी येथील बाजारपट्टा या ठिकाणी ‘विजयी संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली असून मंत्री गुलाबराव पाटील यावेळी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विकासकामावर मतं मागण्यावर भर
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामं केल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आतापर्यंतच्या प्रचार करते वेळी केला असून अनेक योजना, भरघोस निधी जळगाव ग्रामीण मतदारसंघात आणल्या आहेत. रस्ते, पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत 5 वर्षे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला आहे. उर्वरित कामं येणाऱ्या काळात पूर्ण होतील.मात्र विरोधकांनी मला श्रेय मिळू नये, म्हणून खोटे आरोप करत जातीय समीकरण मांडून मतदारांना संभ्रम निर्माण केला असला तरी मतदारसंघातील नागरिकांना सर्व गोष्ट माहित आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे यावर्षीची निवडणूक आपण लढून जिंकून येणार असल्याचा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांना आहे.
मविआची प्रत्येक चाल अयशस्वी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. जातीच्या आधारावर विभाजन होऊ नये, हे हिंदूंमध्ये रुजवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी उचलली आहे. लोकसभेचा अनुभव लक्षात घेता विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आणि महायुती कोणताही धोका पत्करायला तयार नाही.असं असलं तरी जळगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामांच्या जोरावर मत मागण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोर दिला आहे. आजच्या पाळधी येथील सभेत गुलाबराव पाटील नेमकं काय बोलतात त्यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.