वाशिम(प्रतिनिधी)- महायुती सरकार ने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, घोषित केलेले दोन्ही महामंडळ कार्यान्वित करणे व राज्यपाल नियुक्त पत्रकाराचा एक आमदार करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची ग्वाही स्वतंत्र प्रभार केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी दिली.
भारत सरकारचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मेहकर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळासह रविवार ३ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन पत्रकाराच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. पत्रकाराच्या मागण्यांना न्याय द्यावा व महामंडळाची स्थापना करावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली.याची दखल देऊन शासनाने दोन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही महामंडळावर प्रदेशाध्यक्ष मुंडे यांच्या बरोबर शासनाने सविस्तर बैठक व चर्चा करून सदर मंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी केली. महाराष्ट्रात आता पत्रकार सुद्धा एक गठ्ठा मतदार असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची वीस हजार मताची ताकद आहे.त्यामुळे शासनाने पत्रकाराच्या मागण्याचा विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी निलेश सोमानी यांनी केली . केंद्रीय मंत्री जाधव यांनी पत्रकाराच्या सर्व मागण्या संदर्भात यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.व पुन्हा सरकार आल्यास मी सर्व मागण्यांसाठी प्रयत्न करिल अशी ग्वाही दिली.