जळगाव,(प्रतिनिधी)- मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू, त्यांची जीभ कापून घेऊ, इस्लाम धर्म हा अत्याचार करणारा आहे, मी हिंदूचा गब्बर आहे असे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे आमदार नितेश राणे विरुद्ध जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक ७८३/२४ भारतीय न्याय सहींता कलम १९६(१) ख, व ग तसेच २९८, २९९,३०२ प्रमाणे ॲड.अजयकुमार सिसोदिया व ॲड.दीपक सोनवणे यांच्या मार्फत फिर्यादी फारूक शेख अब्दुल्ला एकता संघटन समन्वयक यांनी तक्रार अर्ज दाखल केला असून पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलेली आहे.
भारतीय नागरिक न्याय संहिता कलम १७५ प्रमाणे खटला दाखल
१ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात जो कोणी काही मत प्रदर्शित करेल अथवा काही कारवाई करेल तर त्या मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारू, त्यांची जीभ कापून घेऊ, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते
जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रामगिरी महाराजांच्या विरुद्ध फारूक शेख यांच्या तक्रारीवरून दि. २७ ऑगस्ट रोजी खबर क्रमांक १/२०२४ बी एस एन कलम १९२, १९६, १९७, २९९, प्रमाणे दाखल होऊन तो गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन सिन्नर जिल्हा नाशिक येथे वर्ग करण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी जे वक्तव्य केले होते ते मला व जळगावकरांना उद्देशून केलेले आहे कारण २७ ऑगस्ट रोजी आमच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांनी आम्हा जळगावकर मुस्लिम समाजास उद्देशून बोलले असल्याने फारुक शेख यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन निरीक्षक यांना दिनांक ४सप्टेंबर रोजी तक्रार केली होती त्यावर काही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस महासंचालक महाराष्ट्र,विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुद्धा वारंवार तक्रारी दाखल केल्या परंतु त्यावर काही कारवाई न झाल्याने भारतीय नागरिक न्याय संहिता कलम १७५ प्रमाणे जळगाव येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात सदरचा फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे.
एकता संघटनेतर्फे खटला दाखल
जळगाव जिल्हा एकता संघटनेची स्थापना झाली असून त्यात सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व सामाजिक संघटनेतील लोकांचा समावेश असून त्यानुसार एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी सदर ची तक्रार दाखल केली आहे.
यावेळी संघटनेचे संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, अनिस शहा , अन्वर खान, अहमद सर , इरफान अली सय्यद, युसुफ खान, फिरोज शेख व अमजद पठाण आदींची उपस्थिती होती.