जळगाव दि.२ प्रतिनिधी – आपआपसातील जात, पात धर्म भेद न पाळण्याचा संकल्प करा, प्रतिज्ञा ही फक्त म्हणायची नसते ती प्रत्यक्ष कृतीत आणायची असते. येत्या दिवाळीत आपण उपेक्षीत घटकातील सदस्यांना आपल्या घरी बोलावून त्यांना आनंदात सहभागी करुन घ्या असे आवाहनही ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, स्पर्धेचे परिक्षक सुदिप्ता सरकार, रश्मी कुरंभट्टी, पदमजा नेवे व गांधी रिसर्च फाऊंडनच्या ग्राम विकासाचे सुधीर पाटील उपस्थित होते. परिक्षकांच्या वतीने सुदिप्ता सरकार व पदमजा नेवे यांनी स्पर्धेचे निकष मनोगतातून व्यक्त केले.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती व महापुरुषांचे विचार पोहचावेत या उद्देशाने ही स्पर्धा घेतली गेली. शहर व ग्रामीण मिळून २१ शालेय संघांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि १५००/- ची रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह, व प्रशस्ती पत्रक देण्यात आले.
ग्रामीण गटात प्रथम विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल, सावखेडा, द्वितीय अनुभूती निवासी स्कूल, तृतीय एल.एच. पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल वावडदा,उत्तेजनार्थ ब.गो. शानबाग विद्यालय सावखेडा तर जळगाव शहर गटात प्रथम ओरियन इंग्लिश मिडीअम सीबीएससी, द्वितीय शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय, तृतीय ए टी झांबरे विद्यालय, उत्तेजनार्थ बालविश्व इंग्लिश मिडीअम स्कूल यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. गिरीष कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, शालीग्राम राणे, चंद्रशेखर पाटील, योगेश संधानसिवे, तुषार हरिमकर, विश्वजीत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, चंद्रकांत चौधरी यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.