पाचोरा:- पाचोरा भडगाव तालुक्यातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खंबीर असून माजी आमदार दिलीप वाघ यांनी काळजी करण्याऐवजी आराम करावा.असा टोला आमदार किशोर पाटील यांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना लगावला. आ किशोर पाटील यांनी येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत दिलीप वाघ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख एड दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय गोहिल तालुकाप्रमुख शरद पाटील जि प सदस्य पदमसिंग पाटील दीपक राजपूत शरद पाटे भरत खंडेलवाल आदी उपस्थित होते.
11 जून रोजी वादळी वाऱ्याने भडगाव तालुक्यात केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित पिक विमा नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या .याविषयी आ.पाटील यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करून याविषयी सदनाचे लक्ष वेधले होते.यावर दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदारांना प्रश्न मांडता आला नाही अशी टीका केली होती. दिलीप वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार पाटील यांनी मी शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न योग्य पद्धतीने मांडले असून विधानसभेचा सदस्य झाल्यापासून सातत्याने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे.विशेष म्हणजे मी मांडलेल्या प्रश्नांची संबंधित खात्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेऊन तत्पर कारवाई केली आहे.याउलट दिलीप वाघ आमदार असताना त्यांनी सदनात एखादा विषय उपस्थित केल्याचा व्हिडिओ त्यांनी दाखवून द्यावा. असे आव्हान देखील आमदार पाटील यांनी यावेळी केले.खरं तर दिलीप वाघ यांची टीका केविलवाणी असून त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा काही शिकण्याचा प्रयत्न करावा असा टोला आमदारांनी यावेळी लगावला.