जळगाव – शिकण्यासाठी काही क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे त्यात ‘कुतूहल जागृती’ ही पहिली पायरी यातून व्यवहार ज्ञान, शिस्त, चरित्र, काळासोबतच भविष्याची दृष्टी,जीवनात यशस्वी होण्याचे किमान कौशल्य, विज्ञानदृष्टी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘एड्युफेअर’ दिसली. सोबतच विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागूणांचा आनंद,संस्कृती संवर्धनासह घेता आला. आगळ्या–वेगळी शैक्षणिक जत्रा नाविन्यपूर्ण, कल्पकता व सृजनशिलतेला वाव देणारी ठरली.
अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल प्रायमरी व सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘एड्युफेअर–2019’ खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य लॉनवर पाच दिवसापासून सुरू होता. या शैक्षणिक जत्रेचा आज समारोप झाला. संपुर्ण पाचही दिवस विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी मोठ्या संख्येने एड्युफेअर ला उपस्थिती लावून माणूसपण जपण्याचे मूल्यशिक्षण देणाऱ्या मनोरंजक दुनियेची सफर केली. विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांसाठी खेळता–खेळता शिका व शिकता–शिकता खेळा या संकल्पनेला एड्युफेअरने कल्पनेतून गणितीय, भूमितीय प्रतिकृतींना एकरूप केले. मुलांच्या सर्वांगीण विकाससाठी मेंदुला चालना देण्याची आवश्यकता असते. एड्युफेअरमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संभाषण कौशल्यासह केलेले सादरीकरण त्यांच्या क्षमतांची जाणिव करून देते. चटकारदार खाऊगल्ली, मनोरंजक जादूचे प्रयोग, अफलातून टॅलेन्ट शो, अॅडव्हेंचर झोन, ऑप्टीकल इल्युजन्स, विविध साहसी खेळ जळगावकरांनी अनुभवले. ‘प्रत्येक मनुष्य सन्मानाने राहू शकेल आणि मोठा होऊ शकेल, असा समाज घडवायचा असेल तर एड्युफेअरसारखे उपक्रम महत्त्वाचे आहे’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्यात. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक,शिक्षकतेतर सहकारी व विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या उपक्रमाचे जळगावकरांनी कौतूक केले.