जळगाव,(प्रतिनिधी)- एका ६ वर्षाच्या चिमुकलीला फूस लावून गावाबाहेर घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली आहे.या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेड गाव शिवारात घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार जामनेर येथून नजीक असलेल्या जळगाव रस्त्यावरील चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले असताना घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन नराधम गावाबाहेर घेऊन गेला तिथेच तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, या घटनेतील मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यानंतर आई वडिलांनी मुलीची शोधा शोध सुरु केली. यावेळी चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. काल रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. गावातील एका संशायीत तरुणाचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळं या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे.