जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपला आपला जळगाव जिल्ह्याचा ‘गड’ राखण्यात यश मिळाले असून भाजपाचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा जिल्ह्यात कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजपने आपली विजयाची परंपरा सलग चौथ्या पंचवार्षिकमध्येही कायम ठेवली आहे.
प्रतिष्ठेच्या झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांनी उद्धवसेनेचे करण पाटील (पवार) यांचा तब्बल २,४१,३९६ मतांनी पराभव केला आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅटट्रिक साधत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा २,७२,१८३ मतांनी पराभव केला. रक्षा खडसे यांना ६,३०,८७९ तर स्मिता वाघ यांना ६,७४,०२६ मते मिळाली.









