एरंडोल (दि. १६ एप्रिल २०२४) :राज्यात मागील १० वर्षांपासून जे काही सुरू आहे, ते आपण पाहतोय. त्यांच्या फोडाफोडीचे राजकारण आणि जुमलेबाजीला आता जनता कंटाळली असून भाजपचा उलटा प्रवास सुरू झाला आहे, असे प्रतिपादन माहविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांनी केले.
एरंडोल तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार, दि. १६ रोजी एरंडोल येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते माजी आ. सतीश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पवार, नाना महाजन, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश देसले, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, विकास पवार, विजय महाजन, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, किशोर निंबाळकर, नगरसेवक असलम पिंजारी, अनुराग बेलदार, प्रवीण वाघ, ॲड. अरमान सैय्यद, पराग पवार, राजेंद्र चौधरी, गुलाबसिंग पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
करण पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, तशी राजकारणातही आहे. आपल्याला मान खाली घालायची नसेल तर आपल्याला सुश्म नियोजन करावे लागेल. देशात लाट ओसरल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचा जो कट्टर कार्यकर्ता आहे तो अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांच्या प्रवेशाने अस्वस्थ आहे. भाजपात प्रचंड अस्वस्थता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
*जनतेत संतापाची लाट : माजी आ. सतीश पाटील*
राज्यात जे काही फोडाफोडीचे राजकारण केलं गेलं, यामुळे जनतेत संतापाची लाट पाहायला मिळत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकावी लागेल.
जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी केलेल्या राजकारणामुळे अनेकांचे बळी गेले. माजी खा. ए. टी. पाटील यांचे तिकीट कापले गेले. मंगेश चव्हाण यांच्यासाठी उन्मेष पाटील यांची इच्छा नसतांना त्यांना लोकसभा लढायला लावली. उन्मेष पाटील यांचं काम सर्वोत्तम असतांना त्यांचे तिकीट कापले गेल्याचा आरोपही माजी आ. सतीश पाटील यांनी केला.
वाडी, वस्तीपर्यंत आपली निशाणी पोहचवा : संजय सावंत
आजपासूनच आपल्याला प्रचाराला लागायचे आहे. आपल्यासाठी एक-एक दिवस महत्वाचा असून प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांडा आदी ठिकाणी जावून प्रचार करायचा आहे. त्यांच्यापर्यंत आपली निशाणी पोहचवायची आहे, असे आवाहन संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.
अबकी बार… करण पवार : गुलाबराव वाघ
यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, दादागिरी विरुद्ध सन्मानाची आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गाव, गल्लीत फिरून करण पाटील यांना विजयी करायचे आहे. विरोधकांकडून अबकी बार चारसो पारचा नारा दिला जात आहे. मात्र, आपल्याला ‘अबकी बार… करण पवार’ चा नारा द्यायचा असल्याचे सहसंपर्क गुलाबराव वाघ यावेळी म्हणाले.
मेळाव्यात जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, राष्ट्रवादीचे उमेश देसले, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पारोळा तालुकाध्यक्ष आर.बी. पाटील, जगदीश पाटील, माजी जि.प. सदस्य नाना महाजन, रवींद्र चौधरी आदींनी देखील मनोगत व्यक्त केले.
जल्लोषात स्वागत
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांचे एरंडोल येथे आगमन होताच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करु, असा शब्द दिला. मेळाव्याचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले.