जळगाव-(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमनपदी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित दिलीपराव निकम यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, नथू दामोदर पाटील, वसंत मुरलीधर साबळे, रामनाथ चिंधु पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, नीलकंठ आनंदा नारखेडे, सुदाम पाटील, राजूभाऊ पाटील, मंगलअण्णा पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, श्री. सूर्यवंशी, बापू पाटील, नाना पाटील, गोकुळ चव्हाण, श्री. कांबळे आदी मान्यवरांनी राज्य मार्केटींग फेडरेशनचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन रोहित निकम यांच्या निवास्थानी भेटी घेऊन अभिनंदनाचा वर्षाव केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनया संस्थेवर प्रथमच भाजपाला व्हाईस चेअरमन पद रोहित निकम यांच्या रूपाने मिळालेले आहे. नाफेड व राज्य शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणून किमान आधारभुत खरेदी योजनेंतर्गत धान्य व भरड धान्य खरेदी करते. संपुर्ण महाराष्ट्रात रासायनिक खतांचा व्यवसाय देखील करते. राज्यभरात पणन महासंघाच्या मालकीचे १३५ गोदामे आहेत. व्हा. चेअरमन रोहित निकम यांच्या मातोश्री शैलजादेवी निकम यांनी २० वर्षांपुर्वी राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमन म्हणून कामकाज पाहिलेले आहे. सलग दोन वेळा व्हा. चेअरमनपद त्यांनी भुषणवले असून पुन्हा सहकारातील राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होवून रोहित निकम हे त्या पदावर विराजमान झाले आहेत. रोहित निकम हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी संघटनेमध्ये देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीत विश्वासू कार्यकर्ता म्हणून रोहित निकम यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी रोहित निकम यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.