लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या सात जागेवर विना अट पाठिंबा दिला असल्याचं जाहीर करूनही काँग्रेसने लोकसभेसाठीची दहावी यादी प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देत प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांविरोधात महाविकास आघाडीने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर विना अट पाठिंब्याची घोषणा केली आहे. त्यापैकी दोन मतदारसंघात पाठिंबा जाहीरही केला आहे. त्यानंतरही काँग्रसकडून प्रकाश आंबेडकरांविरोधात अकोल्यात उमेदवाराची घोषणा झाली आहे यामुळे आता वंचित आघाडी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून वंचित काँग्रेसला सात जागांवर विना अट पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पत्राला खर्गेंकडून काय प्रतिसाद मिळाला याची माहिती त्यांनी नंतर दिली नसली तरी कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि नागपूरमध्ये विकास ठाकरे यांना आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए कांग्रेस उम्मीदवारों के नाम की दसवीं लिस्ट। pic.twitter.com/V2lMWozoTR
— Congress (@INCIndia) April 1, 2024
गेल्या कित्येक निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यातून पराभव होत आला आहे. येथे काँग्रेस, भाजप आणि प्रकाश आंबेडकर अशीच लढत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होते. काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतविभागणीत भाजपचा विजय होत आला आहे. यंदा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विनाअट सात मतदारसंघात पाठिंब्याची घोषणा केली होती. त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिसाद देत अकोल्यातून उमेदवार देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने या निवडणुकीत सुद्धा तिरंगी लढत होईल असंच दिसत आहे.