जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त सुरु असलेल्या मिरवणुकीवर गुरुवारी दि. २८ मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत सुमारे ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरु केली असून आतापर्यंत १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असते. गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत निघाली होती. यावेळी तरुणांचा जल्लोष दिसून येत होता. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक मज्जिदी जवळ आली. तेथे काही काळ वाजा बंद केला. त्याचवेळी अचानक जवळील प्रार्थनास्थळावरून व घरावरुन अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. यामुळे मिरवणुकीतील तरुण जखमी झाले. काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने त्यांच्यातही विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली) हा जखमी झाला.
बंदोबस्तावर असलेले पोलिसदेखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह ५ ते ६ जण जबर जखमी आहेत. घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु होते.
०००००००००००००००