भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा हा महाउत्सव भयमुक्त व आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी आदर्श आचार संहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. या आचारसंहिता कालावधीत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” व “काय करु नये” याबाबत मागदर्शक तत्त्वे आयोगामार्फत सांगण्यात आली आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा…
आदर्श आचारसंहिता : “काय करावे”
1) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.
2) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडानिवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल.
3) मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेचे रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा चालू ठेवता येऊ शकेल.
4) मैदानांसारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे करता आला पाहिजे.
5) इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पाडलेली कामे, केवळ याबाबींशी संबंधित असावी.
6) शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.
7) इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा व मिरवणूकीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत. स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
8) प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सुट वेळीच मिळवावी.
9) प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी.
10) सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
11) मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, मिरवणूकाचा मार्ग आणि ती जेथे मिरवणूक संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येवून पोलिस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
12) मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे.
13) मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये.
14) मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरितीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.
15) बिल्ले व ओळखपत्र, निवडणूकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ठळकपणे लावावीत.
16) मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठ्या या साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवारांचे किंवा पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असणार नाही.
17) प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल.
18) निवडणूक आयोगाचे वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही.
19) निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/क्षेत्र/प्रभाग/दंडाधिकारी यांच्या किंवा भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.
20) निवडणूक आयोग/निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणूकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबीविषयीचे निदेश/आदेश/सूचना यांचे पालन करण्यात यावे.
आचारसंहिता : “काय करु नये”
1) सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी सध्या केलेल्या कामगिरी विषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे.
2) कोणताही मंत्री, तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.
3) शासकीय कामाची निवडणूक मोहिम/निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये.
4) मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये.
5) मतदारांच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.
6) विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील सध्याचे मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
7) इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
8) इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेल आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करू नये.
9) शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारा विषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये.
10) कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इत्यादी बांधण्याचे वचन देणे इ. गोष्टी करू नयेत.
11) शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत.
12) निवडणूक प्रचार तसेच भाषण, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी यासाठी देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये.
13) लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकटपशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदान कक्षापासून १०० मीटरच्या आत निवडणूक प्रचार करणे, मतदानाची वेळ समाप्त होण्याच्या वेळेबरोबर संपणाऱ्या ४८ तासांच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहे.
14) व्यक्तीची मते किंवा कृत्ये याविरुध्द व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरण्यात येऊ नये.
15) कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवारभिंत इत्यादीचा वापर त्यांच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीसी चिकटविणे किंवा घोषणा इत्यादी यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल.
16) इतर राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.
17) एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येऊ नये.
18) दुसऱ्या पक्षाने किंवा उमेदवाराने काढलेली प्रचारपत्रके काढून टाकण्यात येऊ नये.
19) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचार पत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.
20) ध्वनीवर्धकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसवलेले असोत, सकाळी ६.०० वाजण्यापूर्वी किंवा रात्री १०.०० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करू नये.
21) संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेतली असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मोर्चात ध्वनिवर्धकाचा वापर करू नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/मोर्चे रात्री १०.०० वाजल्यानंतर चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही व याखेरीज ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षितेच्या आवश्यकतेच्या स्थानिक दृष्टिकोन आणि हवामान, सणासुदीचा मोसम, परीक्षेचा काळ याच्या अधिनतेने असतील.