पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) यांचा दोन तुकडे झालेला मृतदेह परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत समजू शकले नाही,शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वेरुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांना परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन, पंचनामा करून परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची माहिती मिळालेली नाही. तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही.