पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा नगर पालिका हद्दीतील नागरी प्रश्न व समस्यांची सोडवणूक करण्यास प्राधान्य देणार असून मोकाट जनावरे , कुत्रे , अस्वच्छता , रोगराई तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हे विषय प्राधान्याने सोडवणार असल्याचे पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी नगर येथे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले मंगेश देवरे यांनी नुकताच पाचोरा नगरपालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. सफाई कामगारांशी संवाद साधला.शहरातील प्रमुख रस्ते चौक यांची पाहणी केली. शहरातील ज्वलंत प्रश्न व समस्यां संदर्भात माहिती घेतली. पत्रकारां कडून प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. त्यांनी स्पष्ट केले की , गेल्या दोन दिवसापूर्वीच मोकाट गायींच्या हल्ल्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला.मोकाट कुत्र्यांच्या हल्यात विद्यार्थी व महिला जखमी झाले या घटना दुःखदायी असून मोकाट कुत्रे व जनावरांचा प्रश्न मार्गी लावणार जनावरांना कोंडवाड्यात टाकून त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार आहे. शहरातील अस्वच्छता व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई आणि आरोग्याचा प्रश्न या संदर्भात सुयोग्य नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गा लगत व्यवसाय करणाऱ्या मास व मासे विक्रेत्यांनी यांची चौकशी करून त्यांना असलेली मान्यता जाणून घेऊन त्यांना दुकानातील घाणीची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्या संदर्भात नोटीसा देण्यात आल्याचे सांगून घाणीची योग्य ती विल्हेवाट न लावल्यास कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला. शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा नियमित व योग्य दाबाने देण्यासंदर्भात नियोजन करणार असल्याचे स्पष्ट केले. शहराचे मुख्य रस्ते , शाळा व मंदिरांचा परिसर या भागातील वाहतुकीची कोंडी व पर्यायाने होणारे ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे सांगुन शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे , भुयारी मार्गातील गतीरोधकांचे बाहेर आलेले खिळे या संदर्भातही माहिती घेतली आहे . हे प्रश्न मार्गी लावून पालिकेचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे स्पष्ट केले .नागरिकांनी व मालमत्ता धारकांनी आपल्या कडील कर मुदतीत भरावेत.ओला कचरा व सुका कचरा यांची विभागणी करून घंटागाडीतच कचरा टाकावा. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. पालिकेला योग्य त्या कामकाजासाठी सहकार्य करावे. पालिकेच्या कोणत्याही विभागा संदर्भात तक्रारी असल्यास मुक्तपणे मांडाव्यात त्यांची सोडवणूक प्राधान्याने करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.