जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या वतीने ‘अबकी बार मोदी सरकार’ ही टॅग लाईन असलेलं पक्षाचं ‘कमळ’ चिन्ह जळगाव शहरातील खाजगी व शासकीय मालमत्तेवर विना परवानगी रंगविले असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जळगाव मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार शहरातील झेंडे, बॅनर इ. काढण्यास आपणाकडून सुरूवात करण्यात आली आहे परंतु भारतीय जनता पार्टी या राजकीय व सत्ताधारी पार्टीने जळगाव शहरातील खाजगी मालमत्तेवर तसेच शासकीय मालमत्तेवर ‘कमळ‘ हे चिन्ह रंगवून जाहीरातबाजी चालविली आहे.
वास्तविक अशा राजकीय पक्षाच्या चिन्हाची भिंती रंगवून जाहीरात करावयाची असल्यास तया मालमत्ता धारकाने मनपाची सर्व देणी अदा केलेली असणे आवश्यक असते. असे सर्व सोपस्कार पार पाडून मनपाची परवानगी व चिन्ह ज्या साईजची आहे त्याप्रमाणे व जेव्हढे दिवस जाहीरात लावणार असाल त्याबाबत माहीती व दरदिवसाप्रमाणे शुल्क (शासकीय फी) व ज्या-ज्या ठिकाणी भिंती रंगवणार त्या-त्या ठिकाणची पूर्ण माहीती नमूद करणे आवश्यक असते.
शहरातील बहुसंख्य भागात बुथवाईज असलेल्या खाजगी व शासकीय मालमत्ता (उदा. शहरातून जाणाऱ्या बहिणाबाई उड्डाण पुलावर) वर चिन्ह रंगवून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
तरी परवानगी न घेता मनपा हद्दीतील खाजगी व शासकीय मालमत्तेवर चिन्ह रंगविल्याबद्दल शहर विद्रुपीकरण कायद्याखाली सदर पक्षावर गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वरील ठिकाणी रंगविण्यात आलेले राजकीय पार्टीचे निवडणूक चिन्ह त्वरीत हटविण्यात यावी अशी मागणी आपणाकडे करण्यात येत आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी,उपाध्यक्ष किरण राजपूत,माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी,युवक सरचिटणीस हितेश जावळे,सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष भाऊराव इंगळे आदी उपस्थित होते.