मुंबई : भाजप EVM शिवाय 400 पार होणार नाही. म्हणून EVM हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.
VVPAT पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. EVM ची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणे अपेक्षित असते. या नंतर VVPAT ची पुन्हा मोजणी मागितली असेल, आणि त्यामध्ये निकाल कोणाचा मानायचा तर यावर संसद स्वतः म्हणत आहे की, VVPAT चा निकाल हा अंतिम निकाल असेल. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगासमोर याचा आग्रह होत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, एकदा EVM मध्ये पोल मतदान आणि मोजणीचे मतदान यात फरक आला, तर निवडणूक निकाल घोषित करता कामा नये. VVPAT मोजले पाहिजेत, संसद म्हणत आहे की, VVPAT चा निकाल हा अंतिम आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने चूक करू नये.
आम्ही प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहोत की, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी केली जाईल. छाननीमध्ये आपला अर्ज टिकला, तर संबधित अधिकाऱ्याकडे आपण अर्ज केला पाहिजे की, मोजणीच्या दिवशी अर्ज 17 मध्ये किती मतदान झाले याचे अधिकृत आकडे संबंधित अधिकारी देतो. तो अर्ज 17 त्यांनी घेतला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं पाहिजे की, मोजणीचे मत जे आहे त्यामध्ये एकतर कमी किंवा जास्त पोल मतदान झाले आहे. असेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत या विषयी चर्चा केली आहे. निवडणूक आयोगाकडे आपण सगळ्या पक्षांना घेऊन जाऊ आणि जेवढे तथ्य आहे त्यांच्यासमोर मांडू, असे त्यांना म्हटले असल्याचेही त्यांनी सांगितले.
*बॅलेट पेपरवर निवडणुका घेवूनही मतमोजणी वेळेत करणे शक्य -*
मला 1985 च्या निवडणुकीचा अनुभव आहे. तेव्हाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होती. 1989 ची निवडणूकसुद्धा बॅलेट पेपरवर झाली. बॅलेट पेपरवरील मतदान मोजायला 15 दिवस लागतील, असे नव्या पिढीला सांगितले जाते हा चुकीचा प्रचार आहे असे मी मानतो. त्यावेळेस मतदान संपलं की, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा रात्री 12 च्या आधी निकाल यायचा. असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.
—
ईव्हीएम हॅक होवू शकते याचा डेमो –
दरम्यान, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी ईव्हीएम कशा पद्धतीने हॅक होऊ शकते याचा डेमो सादर करण्यात आला. तसेच, शून्य मत कसे मिळते हेदेखील दाखवण्यात आले. त्यामुळे इव्हीएम बदला किंवा रद्द करा अशी आमची मागणी नाही. मात्र, ज्या उमेदवाराला मत दिले जाणार आहे. त्याची स्लीप थेट बॅलेट बाॅक्समध्ये न पडता मतदाराच्या हातात आली पाहिजे. तसेच, मतदारांनी उमेदवाराच्या गोष्टी व्हेरिफाय करुनच ती स्लीप बॅलेट बॅाक्समध्ये टाकली पाहिजे. यासंदर्भातली याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली असून, तिची तारीख ४ एप्रिल ठरवण्यात आल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
आंदोलनाचा इशारा –
बऱ्याच मतदारसंघात मतमोजणी आणि पोल मतदान यामध्ये फरक आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हा फरक का आला याचे अजूनही उत्तर दिले नाही. सोलापूरमधल्या निवडणुकीच्या संदर्भात रिटर्निंग अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्र दिले आहे की, पोल मतदान आणि मोजणी मतदानामध्ये तांत्रिक बाबीमुळे फरक आलेला आहे. हे एका रिटर्निंग अधिकाऱ्याने कबूल केले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या वतीने असा प्रयत्न केला जात आहे की, ही याचिका खारीज व्हावी असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे यापुढे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
—