मुख्यमंत्र्यांच्या आज होणाऱ्या मुक्ताईनगर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांना जबरदस्ती केली जातेय, नाही आलात तर कोणतेही कारण चालणार नाही. उपस्थित नाही राहीला तर ५० रुपये दंड आकारण्यात येईल. आजारी आहे, लग्न आहे, जमले नाही अशी कारणे ऐकून घेतली जाणार… pic.twitter.com/L0loIkUuFd
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 4, 2024
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी बचत गटाच्या महिलांना धमक्या देऊन सभेला येण्यासाठी जबरदस्ती केली गेल्याचा धक्कादायक आरोप अॅड. रोहिणी खडसे यांनी केला आहे. सभेला न आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबत देखील धाक दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान दोन महिलांच्या संभाषणाची एक रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली आहे.’नजरकैद’ या रेकॉर्डिंगची पुष्टी करित नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दि. ५ रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. दौऱ्यातील विविध कार्यक्रमासाठी उपस्थिती देण्याकरिता काही महिला बचत गटाच्या महिलांना सांगण्यात आले. मात्र उपस्थिती नाही दिली तर ५० रुपये दंड करू तसेच बचतगटातून काढूनही टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याची माहिती
अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली आहे. जर मुख्मयमंत्र्यांच्या सभेसाठी महिला वर्गाला धमक्या मिळत असतील तर हि बाब धक्कादायक आहे. यामुळे सत्ताधारी प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. अॅड. खडसे यांच्याकडे स्क्रीनशॉट व रेकॉर्डिंगदेखील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी महिलांना धमक्या देणे हा प्रकार गंभीर आहे.