जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा ता. रावेर जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे आणि किनगांव ता. यावल जि. जळगांव येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होतं असून या प्रकल्पाच्या उदघाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी फेसबुक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान खडसे यांनी आज सावदा ग्रामीण रुग्णालयास भेट देखील दिली असून भेटीचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.
काय आहे फेसबुक पोस्ट
माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की,मुक्ताईनगर मतदारसंघातील सावदा या शहरात नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती. मात्र परिसरात जवळच असलेल्या रावेर आणि पाल येथे ग्रामीण रुग्णालये कार्यान्वीत होती. असे असतांना देखील मी विशेष बाब म्हणून सावदा येथे शहरी भाग असूनही ग्रामीण रुग्णालय मंजूर करुन घेतले होते.आज हे अद्ययावत रुग्णालय पूर्णत्वास आले आहे. रुग्णालयाची भव्य अशी दुमजली इमारत व परिसरातच कर्मचाऱ्यांसाठी निवास्थाने उभारण्यात आली आहेत.उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. आज या रुग्णालयास भेट दिली. आपण आग्रहाने सरकारकडून मंजूर करुन घेतलेला प्रकल्प पूर्णत्वास आल्याचा आनंद व समाधान आहे. कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणाऱ्या कार्यक्रमास एकनाथराव खडसेनीं दिल्या शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होतांना दिसत असली तरी सावदा ग्रामीण रुग्णालय हे खडसेनीं मंत्री असतांना खास बाब म्हणून मंजुर केले होते ते आज पूर्णतःवास आल्या कारणाने समाधान वाटत असल्यानेच खडसेनीं पंतप्रधान नरेंद्र मोदी उदघाट्न करीत असलेल्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वीचं खासदार असलेल्या सून रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेनीं पुन्हा भाजपात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर खडसेनीं शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केलं होतं, मात्र अशातच मोदींच्या हस्ते उदघाटन होणाऱ्या कार्यक्रमाला खडसेनीं शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन
जळगांव जिल्हयातील सावदा ता. रावेर येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ १८००० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ११,३०० चौरस फुट असे एकुण २९,३०० चौरस फुटाची इमारत आहे.
तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण २४ असुन वर्ग-१ चे एक, वर्ग-२ चे तीन, वर्ग-३ चे आठ व वर्ग-४ चे १२ निवासस्थान आहे.
किनगाव ता. यावल येथील ग्रामीण रुग्णालय
जळगांव जिल्हयातील किनगाव ता. यावल येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.
या इमारतीचे तळमल्याचे क्षेत्रफळ १३२५० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षे. १३,२५० चौरस फुट असे एकुण २६,५०० चौरस फुटाची ची इमारत आहे. तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.
या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण १२ असुन वर्ग-२ चे चार, वर्ग-३ चे आठ निवासस्थान आहे.अशाप्रकारे आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.