जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयाबाहेर वाहनात बॉंम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाच्या सहाय्याने पोलीसांनी कार्यालयाची तपासणी केली असता काहीही आढळून आले नाही ही केवळ अफवा असल्याचे निदर्शनास आले.
राज्याचे जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव येथे शिवतीर्थ (जी.एस.) मैदानासमोर संपर्क कार्यालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कार्यालयाच्या बाहेर उभे असलेल्या वाहनात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन सायकांळी साडेसात वाजता आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलीस बॉम्ब शोधक पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या वाहनांची कसून तपासणी केली तसेच श्वानपधकाच्या साह्याने कार्यालयाचीही तपासणी केली मात्र कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. यावेळी कार्यालयासमोर नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.