जळगाव,(प्रतिनिधी): महानगर पालिकेच्या गेल्यानिवडणुकीत भाजपाने जळगावकरांना दिलेल्या जाहीरनाम्याचा भाजपाला विसर पडला असून मंत्री गिरीश महाजण, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी वजन वापरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी जळगावच्या विकासात्मक दृष्टीने तरतूद करावी अशी अपेक्षा माजी महापौर जयश्री महाजन पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत जयश्री महाजन म्हणाल्या की,राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगाव शहरातून जाणाऱ्या चौपदरीकरण, महामार्गाचे उर्वरित विस्तारित एमआयडीसी, कृषी विद्यापीठासाठी तरतूद व्हावी तसेच ३०० चौरस मीटर घरांना करमाफीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने विखंडनासाठी पाठविला आहे. तो फेटाळण्यात येऊन करमाफी द्यावी अशी अपेक्षा माजी महापौर जयश्री महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे, परंतु पाळधी ते खोटेनगर व कालंका माता चौक ते तरसोद फाटा या दरम्यान चौपदरीकरण झालेले नाही. या मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद झाली तर शहरवासीयांसाठी ही मोठी उपलब्धी असेल. रोजगाराअभावी तरुण, तरुणी शहर सोडून बाहेर जात आहेत. हे थांबविण्यासाठी विस्तारित एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून भूसंपादनाच्या खर्चाची तरतूद करावी. राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाच्या प्रस्तावानंतर नवीन कृषी विद्यापीठासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावसाठी प्रयत्न केले होते. हे विद्यापीठ जळगावला आल्यास रोजगाराचा प्रश्न तर मिटणारच आहे, परंतु कापूस व केळी या पिकांसाठी विद्यापीठ वरदान ठरू शकते. ५००चौरस फुटांच्या घरांना करमाफीचे आश्वासन भाजपनेच महापालिका निवडणुकीत दिले होते. महासभेत आम्ही हा विषय आणला होता, तेव्हा सर्वपक्षीय सदस्यांनी ३०० चौरस फुटांचा निर्णय घेतला. मात्र, नंतर प्रशासकांनी हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविला. गरीब लोकांचा विचार करता भाजपने आता हा विखंडनाचा प्रस्ताव शासनाकडून नामंजूर करून आणावा. आज आपण कोणावरच आरोप करणार नाही, पण विकासासाठी मात्र विनंती करू, असेही जयश्री महाजन म्हणाल्या.
विधानसभा लढणार
आपण शिवसेना ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहोत.जळगाव शहर विधानसभेच्या उमेदवारीत पक्ष पातळीवर आजच्या घडीला माझेच नाव प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. दुसरा कोणी उमेदवार असला तर त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं देखील जयश्री महाजन म्हणाल्या.