पाचोरा (प्रतिनिधी)- जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 17 व्या बहिणाबाई व सोपानदेव खान्देश साहित्य व कवी संमेलनात पाचोरा येथील पत्रकार, कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.
पवन चॅरिटेबल ट्रस्ट (जळगाव), महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ (मुंबई) तसेच युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक कै. पुरुषोत्तम नारखेडे उर्फ मालतीकांत यांच्या स्मरणार्थ सतराव्या बहिणाबाई व सोपानदेव खानदेश साहित्य व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन (जळगाव) येथे एकूण पाच सत्रात हे साहित्य संमेलन संपन्न झाले. साहित्यिक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले. परिसंवाद, कथाकथन, मराठी भाषा, कवी संमेलन व पुरस्कार वितरण आणि समारोप असे या संमेलनाचे स्वरूप होते.
या संमेलनात आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाचोरा येथील पत्रकार तथा कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांच्या हस्ते “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे , कथाकार राहुल निकम, विलास मोरे, संमेलन कार्याध्यक्ष विजयदादा लुल्हे उपस्थित होते.
धनंजय गुडसुरकर यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. प्रा. संध्या महाजन यांनी प्रास्ताविक तर, पत्रकार तुषार वाघुळदे व कवियत्री ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. कवी संजय पाटील यांनी संमेलनाचे प्रकटन केले.