जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) – मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे दुर्गेश्वरीने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली आहे. या यशामुळे दि. २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान वाराणसी येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झाली. जैन स्पोर्टस् अॅकॅडमीची खेळाडू असलेल्या दुर्गेश्वरीचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी अरूण केदार, सहसचिव यतिन ठाकूर, चिफ रेफ्री केतन चिखले यांच्याहस्ते चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जळगावची दुर्गेश्वरी धोंगडे हिने सेमी फायनलमध्ये सिंधुदुर्गची दिव्या राणे हिचा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. त्यानंतर अंतिम सामना तीन लढतीत रत्नागिरीच्या निदा मनोज सप्रे हिच्यासोबत झाला. पहिला सेट दुर्गेश्वरीने जिंकून आघाडी घेतली त्यानंतर निदा सप्रे हिने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली मात्र रोमांचकारी झालेल्या अंतिम सेटमध्ये दुर्गेश्वरी धोंगडे हिने विजय मिळवून महाराष्ट्र कॅरम चषकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षक म्हणून योगेश धोंगडे यांनी काम पाहिले. तिच्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन स्पोटर्स अॅकडमीचे अरविंद देशपांडे, सय्यद मोहसीन यांनी कौतूक केले.