मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह वंचित आणि इतर मित्र पक्षाचे नेते देखील दाखल झाले आहेत.दरम्यान महाविकास आघाडी मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित झाले असून यावेळी महाविकास आघाडीचे नेते खा. संजय राऊत, आ. नाना पटोले, अशोक चव्हाण, आ. जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज या बैठकीत ठरवला जाणार आहे. त्याआधीच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सहा जागांवर दावा सांगितला आहे.
सुरूवातीपासून वंचित महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक होती. परंतु त्यावर अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. अखेर वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. यातच आता महाविकास आघाडीची बैठक ड्रॉयडन हॉटेलला होत आहे. या बैठकीच्या आधी वंचितने अकोल, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई. परभणी आणि अमरावती या जागांवर दावा सांगितला आहे. या जागांवर आमचा उमेदवार देऊ आणि निवडून आणू असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता वंचितला महाविकास आघाडी किती जागा सोडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.