पाटणा – बिहार राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के पाहायला मिळत असतांना नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा देत राजकारणात खळबळ उडवली होती दरम्यान सकाळी राजीनामा देणारे नितीशकुमार यांनी भाजपाला सोबत घेत सायंकाळी पुन्हा नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी नितीशकुमार सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार असून भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीशकुमार यांच्यासह नऊ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
राजभवनाच्या राजेंद्र मंडपम येथे दिनांक २८ रविवार रोजी संध्याकाळी हा शपथविधी पार पडला. त्यात भाजपच्या कोट्यातून डॉ. प्रेमकुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विजेंद्र यादव, विजयकुमार चौधरी आणि श्रवणकुमार हे जदयूचे असून, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय ‘हम’ पक्षाचे संतोष सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीतून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्याला इतर मान्यवरांव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे, ‘हम’ पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी उपस्थित होते.