जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून लवकरच आचारसंहिता लागतील असे चिन्ह आहेत.नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’असा नारा देत तयारी सुरु केली आहे.यासोबतच इतरही राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काही दिवसापूर्वी मोठं विधान केलं होतं.महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता त्या सोबतच त्यांनी विरोधक शिल्लक राहणारं नसल्याचे सांगितले होते.
शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेत भाजपाने शिंदे सरकार स्थापन केले, सरकार सुरळीत सुरु असतांनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार व त्यांच्या सोबतच्या एकूण ४० आमदारांना सोबत घेत राज्यातील राजकारणात लागोपाठ राजकीय भूकंप करण्यात भाजपने यश मिळवलं असतांना मंत्री गिरीश महाजणांनी म्हटल्या प्रमाणे विरोधक शिल्लक राहणारं नाही, मोठा राजकीय भूकंप होणार हे खरं होतांना दिसत असून सुरवात जळगाव जिल्ह्यातून केल्याचे बोललं जातं आहे.काँग्रेस पक्षाचे मोठे नेते असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपात बुधवार दिनांक २४ जानेवारी रोजी प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. त्याच बरोबर मंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्या जामनेर मधून देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होतं आहे, यामुळेचं कदाचित मंत्री महाजन यांनी जामनेर तालुक्यात विरोधक शिल्लक राहणारं नसल्याचं म्हटलं असावं.
लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जातं असतानात दुसरीकडे पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडींना वेगआल्याचे दिसत आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी प्लॅन तयार करत असतांना पुन्हा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठी फुट पडल्या नंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यात काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते भाजपात येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.त्याच पार्श्वभूमीवर मोदी-शाह जोडी लोकसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.त्यामुळे धर्तीवर मंत्री गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.