नंदुरबार : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार शहरातील विविध मंदिरात जाऊन स्वतः स्वच्छता अभियान राबविले.
त्याचबरोबर महा संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सर्व मंदिरांना विद्युत दिव्यांच्या माळा आणि महाप्रसाद मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला. ज्या मंदिरांनी नोंद केली अथवा मागणी केली होती, त्या मंदिरांना गावोगावच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन हे साहित्य पोहोचवले.
दरम्यान, आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजता शहरातील मोठा मारुती मंदिर येथे या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक चौधरी, मंदिराचे पुरोहित दीक्षित, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र उर्फ मांगू माळी, नगरसेवक आनंद माळी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, अर्जुन भाऊ मराठे, भाजपाच्या महिला आघाडी प्रमुख तथा आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त सविता जयस्वाल आणि अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत स्वच्छता केली. या ठिकाणी श्रीराम हनुमान तसेच विठ्ठल रखुमाई यांना मनोभावे प्रार्थना करून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त संपूर्ण शहरवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिर, श्री मोगरा देवी माता मंदिर, श्री वाघेश्वरी मंदिर, श्री संत राम मंदिर या ठिकाणी देखील गाभाऱ्यांची अन मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत श्री दंडपाणेश्वर गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किशोर भाई वाणी, वाघेश्वरी मंदिर ट्रस्टचे भैया मराठे, भूपेंद्र गुरव आदींनी सहभाग घेतला. दरम्यान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्वात जुन्या श्री संतांचे राम मंदिराची माहिती जाणून घेतली.