बीड-(प्रतिनिधी) ईश्वराने बोलण्याचा गुण फक्त मानवालाच दिला आहे. जगात जी परिवर्तने झाली ती बोलणाऱ्या लोकांनीच केली तसेच जो अधिक चांगला बोलतो तो यशस्वी होतो. चांगल्या वक्तृत्वासाठी वाचन व निरीक्षण आवश्यक आहे तसेच चांगली पुस्तके वाचणे व चांगली भाषणे ऐकणे गरजेचे असून तुमच्या शब्दांमध्ये ताकद असायला हवी. अशा स्पर्धा या भविष्यातील यशस्वी नेतृत्व घडविण्यासाठी महत्वाच्या असतात असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. वसंत मुंडे यांनी केले.
बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने दि. १८ जानेवारी रोजी बलभीम महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात ते उदघाटक म्हणून बोलत होते.
या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.संतोष उंदरे होते तर मंचावर उपप्राचार्य डाॅ. बाबासाहेब कोकाटे, प्रा. विजय गुंड, प्रबंधक पी.पी.डावकर, स्पर्धचे परीक्षक डाॅ. एम.ए.कव्हळे, श्री. दादासाहेब मुंडे, श्री. ज्ञानदेव काशिद, मराठी विभागप्रमुख डाॅ. मनोहर सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी काळासोबत चालले पाहिजे. आज तंत्रज्ञान आवश्यक आहे परंतु तंत्रज्ञानाचा अतिरेक करता कामा नये. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत तसेच संवाद कला आत्मसात करणे आवश्यक आहे.
या समारंभाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डाॅ. संतोष उंदरे म्हणाले की, बलभीम महाविद्यालयाला वक्तृत्वाची मोठी परंपरा असून या महाविद्यालयातून अनेक नामवंत वक्ते घडले आहेत. याच परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्येही असलेल्या क्षमतांना संधी मिळावी या उद्देशाने महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली असल्याचे सांगितले.यापुढे प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यातून भविष्यात यशस्वी वक्ते घडावेत हा मानस महाविद्यालयाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डाॅ. मनोहर सिरसाट यांनी प्रास्ताविकातून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजनामागील भूमिका मांडताना सांगितले की, वक्तृत्व ही कला आहे,शास्त्र आहे,कौशल्य आहे आणि ती एक साधनाही आहे.दहा हजारांमधून एक वक्ता तयार होत असतो.अशा वक्त्यांचा शोध घेण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक असतात. महाविद्यालयाला वक्तृत्वाची समृद्ध परंपरा असून ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप परदेशी यांनी केले तर आभारप्रदर्शन डाॅ. रेखा ढेरे यांनी केले.
या उदघाटन समारंभास डॉ.अनिल चिंधे, डॉ.राजेंद्र चव्हाण,प्रा.महारूद्र जगताप, डाॅ. सुनिता बोराडे, प्रा. व्यंकटेश राऊत, डाॅ.रवींद्र काळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध महाविद्यालयातील स्पर्धेक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.