- साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे
- भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण
- सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांना कांताई जैन-साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार, बालकवी ठोमरे, बहिणाबाई व ना.धों महानोर पुरस्काराचेही थाटात वितरण
जळगाव, दि.१६ जानेवारी (प्रतिनिधी)- साहित्यिकांनी नुसतेच लेखक म्हणून नव्हे तर त्यांनी नाविन्य शोधून समाजात ‘टुल किट’ सारखे काम करावे, मी जसा आहे तसाच व्यक्त व्हावे अनन्यसाधारण, युनिक पणा लेखकात असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे तिसरा द्विवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी श्रीमती सुमती लांडे, (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सीताराम सावंत यांना (इटकी, जि. सातारा) यांना समारंभ पूर्वक वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा होय. सर्व पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्कारासोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बहिणाबाई चौधरी मेमोरीयल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.ज्योती जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. निशा जैन व पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते. जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी कविवर्य स्व. ना. धों. महानोर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच शंभु पाटील यांनी भवरलालजी जैन आणि ना.धों. महानोर यांच्या मैत्रीचा पट भुमिका मांडतांना उलगडला. तर प्रास्ताविक श्रीकांत देशमुख केले. त्यात कला, साहित्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृतीतून फाऊंडेशन काम करत असल्याचे ते म्हणाले. चारही पुरस्कार विजेत्यांच्या कार्यपरिचयात्मक डॉक्यूमेंट्री दाखविण्यात आली. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. पसायदानाने सुरवात आणि राष्ट्रगीताने समारोप झाला.
बहिणाईंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार तर निर्मळच! – सुमती लांडे
बहिणाई यांचे साहित्य जगाला दिशादर्शक होते त्यामुळे त्या औलिक होत्या. त्यांच्या नावाने दिला जाणारा निर्मळ पुरस्कार आहे. पर्यावरणाशी दृष्टी असलेल्या वातावरणात जैन परिवाराने जपलेला निसर्गाच्या सान्निध्यातील कृतज्ञतापूर्वक सोहळ्यात हा पुस्कार दिल्याने आनंद आहे. पुरस्काराकडे पाहताना, व्यक्त होताना भरून येते. बहिणाबाईंच्या नावाने हा पुरस्कार मिळणे खूप मोलाचे असल्याचे सुमती लांडे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या.
सद्याच्या काळात कवींची भूमिका मोलाची – अशोक कोतवाल
मानवी जीवनाला कलंकीत करणाऱ्या विकृतींवर हल्लाबोल करण्याचे काम लेखक, कवी आणि विचारवंत करत असतात. अशा काळात कवितेची भूमिका महत्त्वाची ठरते. कवी हे भरकटलेल्या व्यवस्थेला फटकारे मारुन वठणीवर आणण्याचे काम करत असतात. आजूबाजुला घडणाऱ्या प्रसंगाचा विचार करताना असेच का? या प्रश्नाचा शोध कवी सतत शोधतो, चालताना तो कोलमडतो तेव्हा त्याला असे काही चांगले पुरस्कार, सन्मान हात धरुण उभे करत असतात. या पुरस्कारामुळे नवी उमेद येते व पुन्हा तो नव्या जोमाने चालू लागतो. भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशनचे ऋण व्यक्त करून बालकवी ठोमरे पुरस्काराचा मी स्वीकार करत आहे असे अशोक कोतवाल यांनी मत व्यक्त केले.
मानवतेच्या अंगाने हा पुरस्कार मोलाचा – सीताराम सावंत
सध्या शहर व कॉक्रीटच्या जंगलामुळे उपजावू जमिनी कमी होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बिल्डर, विकासक आहेत. ते अशा पिकाऊ भूईला नष्ट करत असल्याने त्यांची विकासक नव्हे तर विध्वंसकाची भूमिका होय. ही बाब आपल्या ‘भुई भुई ठाव दे’ या कादंबरीमध्ये मांडले आहे. आज शब्दांच्या माध्यमातून सांकृतिक, वैचारिक प्रदूषण होत आहे. महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीमत्त्वाला शिक्षीत समाज गांधी वध म्हणत असतो. ही खंत व्यक्त केली. सद्याच्या काळात सिमेंटचे जंगले उभे राहत असताना जैन हिल्ससारख्या बरड जमिनीत जिथे कुसळही उगवत नव्हते तिथे भवरलालजी जैन यांनी नंदनवन उभे केले त्यामुळे हा पुरस्कार मानवतेच्या दृष्टीने खूप अनमोल असल्याचे सीताराम सावंत म्हणाले.
मातीत सजीवता आणणारे व्यक्तीमत्व भरवलालजी जैन – सतीश आळेकर
पडीक रेताळ जमिनीवर अफाट कष्ट घेऊन नंदनवन फुलले आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील विरोधाभास असताना परिवर्तन करण्याची दिशा देणारे भवरलालजी जैन यांनी उभे केले प्रत्येक कार्य हे मातीत सजीवता आणणारे ठरले आहे. त्यात गांधी म्युझियम हे मुख्य केंद्र स्थानी म्हणता येईल. यासह जळगावातील ना. धों. महानोर यांच्य जैत रे जैत चित्रपटाची पटकथा लिहल्याचे आठवण सांगत जळगाव, फैजपूर येथील घाशीराम कोतवाल या नाट्यप्रयोगाविषयी आठवणी सांगितल्या.